मुंबई : खटल्यात साक्ष नोंदवण्यापूर्वी अल्पवयीन बलात्कार पीडितेचा कर्करोगाने मृत्यू होणे हे आरोपीच्या निर्दोषत्वाचे कारण असू शकत नाही. तसेच या कारणास्तव त्याला संशयाचा फायदा देऊन त्याची सुटका केली जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने केली. त्याचवेळी न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला बलात्काराच्या आरोपांत दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडित मुलीने महानगर – दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला जबाब विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती घुले यांनी आरोपीला दोषी ठरवताना प्रामुख्याने ग्राह्य धरला.

पीडितेचा मृत्यू झाला म्हणजे आरोपीवरील सगळे आरोप फेटाळून लावता येणार नाहीत. किंबहुना पीडित मुलीच्या जबाबावर संशय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असेही न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना नमूद केले. न्यायालयाने पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल प्रामुख्याने विचारात घेतला.खटला सुरू असताना पीडित मुलीला कर्करोग असल्याचे निदान झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले गेले. परिणामी तिची साक्ष नोंदवण्यात आली नाही. नंतर या प्रकरणाशी संबंधित खटला सुरू असतानाच पीडित मुलीचामृत्यू झाला. परिणामी आरोपीविरोधात थेट पुरावा नाही. असे असले तरी याप्रकरणी आरोपीला केवळ परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे दोषी ठरवले जात असल्याचे न्यायालयाने म्हटले.

हेही वाचा : जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीची उच्च न्यायालयात धाव; बालप्रसाधन उत्पादन परवाना रद्द करण्याला स्थगिती देण्याची मागणी

पीडित मुलीने महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला, तेव्हा ती सुस्थितीत होती. नंतर आजाराचे निदान झाल्यावर आणि उपचारा – दरम्यान तिचा मृत्यू झाल्याने ती खटल्यात साक्ष देऊ शकली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. आरोपीने केलेले अत्याचार पीडित मुलीने सांगितल्यावर तिच्या आईने आरोपीविरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तिच्या आईने खूप काही सोसले आहे. त्यामुळे तिला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.