पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या विविध प्रकल्पाच्या भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार नजर चुकीने घडला असावा, अशी असे ते म्हणाले. तसेच अरविंद सावंत यांनी आपला कार्यक्रम समजून उपस्थित राहावं, अशी विनंतीही त्यांनी केली.
काय म्हणाले दीपक केसरकर?
“हा प्रकार नजर चुकीने घडला असावा, असं मला वाटतं. कारण निमंत्रण पत्रिकेवर सर्वच आमदार-खासदारांची नावं आहेत. त्यामुळे १०० टक्के ही प्रिंटींग मिस्टेक असू शकते. खरं तर असं होऊ नये. मात्र, दुर्देवाने असं झालं असेल तर आपलाच कार्यक्रम समजून अरविंद सावंत यांनी कार्यक्रमाला यावं”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. तसेच “अरविंद सावंत हे कोकणचे सुपूत्र आहेत. माझे त्यांच्याशी खूप जवळचे संबंध आहे. अशी चूक प्रशासनाकडून घडता कामा नये. परंतू ते माजी मंत्री असल्याने दुसऱ्या कॅटेगिरीत नाव लिहायचं असल्याने इथे लिहिलायचं राहून गेलं असेल”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला; म्हणाले, “घरात आजोबांकडून…”
हा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही शासनाच्यावतीने दिलीगीरी व्यक्त करतो. त्यांनी आपला कार्यक्रम समजून या लोकार्पण सोहळ्यात सहभागी व्हावं. एका विशिष्ट पक्षाचे असल्याने डावललं गेलं, असं मुळीच नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले होते?
हा कार्यक्रम राज्यशासन आणि मुंबई महापालिकेचा आहे. भाजपाचा नाही. दुर्दैवाने पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अनेकदा वावरताना दिसत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपाचा आहे, असं त्यांना वाटतं. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. यापत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांच नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझं नाव नाही. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहिलं नव्हत. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आलं आहे. हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली होती.