मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होऊन दीड महिना होत आला, तरी कार्यालय नूतनीकरण आणि कर्मचारी नियुक्त्या रखडल्याने मंत्र्यांच्या कामकाजात अडचणी येत आहेत. मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी, खासगी सचिव व स्वीय सहायक आदी नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणे आवश्यक असून कठोर निकषांमुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅबिनेट व राज्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी नियुक्त्यांसाठी आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून स्वीय सहायक, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्यांसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

मंत्री कार्यालयातील फर्निचर व अन्य नूतनीकरणाची कामे गेले काही दिवस सुरू आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अडचण आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व काही मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागेचीही अडचण भेडसावत असून अतिरिक्त दालने मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कामकाजही संथ गतीने

मंत्री कार्यालयांचे कामकाज अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यामुळे अनेक मंत्री शासकीय बंगला किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठका घेत आहेत व कामकाज करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

● नियुक्त्यांसाठी चारित्र्य पडताळणी, शिक्षण व अन्य बाबीही तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांकडून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची मुख्यमंत्री कार्यालयात छाननी करण्यात येत असून काही नावांवर किंवा बाबींवर आक्षेप घेण्यात येत आहेत. तर काही नावे परत पाठवून अन्य नावे पाठविण्यास सुचविण्यात येत आहेत.

● ज्या नावांवर कोणतीही हरकत नाही, त्यांच्या नियुक्त्यांना मंजुरीपत्र देण्यात येत असून पुढील कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र अजूनही कर्मचारी नियुक्त्यांना मंजुरी मिळाली नसल्याने त्यांना कार्यालयातील काम द्यावे किंवा नाही, असा प्रश्न मंत्र्यांपुढे आहे.

● काही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी येईल, हे गृहीत धरून त्यांच्याकडून आधीच काम सुरू करण्यात आले आहे. काही मंत्र्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मंत्री कार्यालयात नियुक्त केले असून त्याला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळणार का, हा प्रश्न आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delays in office renovation and staff appointments cause difficulties in ministers work mumbai news amy