डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या सापडलेल्या ठिकाणांवर पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली असली, तरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झालेली नाही. केईएममध्ये दाखल करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून, केईएममधील सात निवासी डॉक्टर डेंग्यूवर उपचार घेत आहेत. त्याचसोबत जेजे रुग्णालयातही डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या असून, पालिकेने याबाबत रुग्णालयाला सात नोटीस बजावल्या आहेत.
डेंग्यूमुळे सर्वच मुंबईकर धास्तावले असून डॉक्टरांनाही या आजाराने जेरीस आणले आहे. गेल्या दोन महिन्यांत केईएममध्ये दहा निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली. गेल्या आठवडय़ात हिंदुजा येथे डेंग्यूवर अतिदक्षता विभागात उपचार करत असलेल्या केईएममधील निवासी डॉक्टरांची परिस्थिती सुधारली असून, त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे समजते. केईएममध्ये मात्र डेंग्यूचा प्रभाव अजूनही कायम आहे. आजमितीला केईएममध्ये सात निवासी डॉक्टर डेंग्यूवर उपचार घेत आहेत. या सर्व डॉक्टरांची प्रकृती सुधारत असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. मंदार बावीस्कर यांनी सांगितले. केईएममधील डेंग्यू पसरवणाऱ्या डासांना अटकाव करण्यासाठी प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. निवासी डॉक्टरांच्या इमारतीमधील डागडुजीही सुरू करण्यात आली आहे.
केईएम रुग्णालयात डासांच्या अळ्या सापडल्याबाबत टीका सुरू झालेली असतानाच राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयातही सात ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्यामुळे पालिकेच्या कीटननाशक अधिकाऱ्यांकडून सात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रुग्णालयाची इमारत स्वच्छ ठेवण्यात येत असली, तरी ४२ एकर परिसर असलेल्या रुग्णालयात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या कीटकनाशक विभागाने कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांत जेजेमधील डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचाऱ्यांनाही डेंग्यूची लागण झाली.
मुख्यमंत्र्यांची केईएमवर धडक
औरंगाबाद दौरा संपवून मुंबई विमानतळावर उतरल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा थेट केईएम रुग्णालयाकडे वळविला. तेथे त्यांनी डेंग्यूच्या रुग्णांना दिला जाणाऱ्या सुविधेचा आढावा घेत रुग्णांशीही संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात रुग्णांना दिल्या जात असलेल्या उपचारांबाबत डॉक्टर तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि बालरोग अतिदक्षाता विभागाला भेट देऊन तेथील रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली. तसचे कुणालाही ताप आल्यावर स्वयं उपचार करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.