देणगी देण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान निर्मित ‘रईस’ चित्रपटात पाकिस्तानी कलावंत माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनास पोलीस संरक्षण दिले जाईल आणि निर्मात्यांनी कोणालाही सक्तीने देणगी देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

‘ऐ दिल है मुश्कील यहाँ’ या करण जोहरच्या चित्रपटात पाकिस्तानी कलावंत असल्याने वाद निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी विरोध केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविली होती. तेव्हा पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला देण्याच्या अटीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध ठाकरे यांनी मागे घेतला होता. आता ‘रईस’ चित्रपटावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने चकमकी होत असून भारतीय सैनिकही शहीद होत आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘रईस’ चित्रपटाला संभाव्य विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून शाहरुख खान यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी सायंकाळी भेट घेतली.

पाकिस्तानकडून अतिरेकी कारवायांना पाठबळ व भारतीय सीमेवर चकमकी होत असताना त्यांच्याशी मनोरंजन, खेळ किंवा कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक क्षेत्रातील संबंधांना शिवसेनेने कायमच विरोध केला आहे. त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटासही शिवसेनेचाही विरोध राहील, पक्षाची भूमिका कायम आहे, असे उच्चपदस्थ नेत्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या चित्रपटाच्या प्रदर्शनास पोलीस संरक्षण पुरविण्याची भूमिका घेतली आहे. सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेल्या चित्रपटांना कोणत्याही चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला देण्याच्या तोडग्यावरून वाद निर्माण झाला होता. त्याबाबत विचारता कोणालाही सक्तीने देणगी द्यावी लागणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘डिअरजिंदगी’ हा पाकिस्तानी कलावंताचा सहभाग असलेला चित्रपट विनासायास प्रदर्शित झाला; पण आता ‘रईस’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.