मुंबई : ‘अभिजात मराठी’सारखे ओटीटी माध्यम काळाची गरज आहे. या ॲपमुळे मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल. मराठीतून आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हे ओटीटी माध्यम आजघडीला अतिशय महत्त्वाचे ठरेल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेचे सामर्थ्य, तिचे जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असताना तंत्रज्ञानाचा हात धरून मराठीही ज्ञानार्जन आणि अर्थाजनची भाषा व्हावी, या उद्देशाने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी माध्यमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या ॲपचा लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतात्पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी ‘अभिजात मराठी’ ॲपच्या संपूर्ण समूहाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणे हा ‘अभिजात मराठी’चा उद्देश आहे. ‘अभिजात मराठी’ या ओटीटी ॲपची निर्मिती करण्यामागचा एकमेव हेतू म्हणजे आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणे आहे. अभिजात मराठी या ॲपवर मराठी चित्रपट, कथाबाह्य कार्यक्रम, वेबसिरीज, आंतरराष्ट्रीय डब काँटेंट आदी मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळेल. हे ॲप मोफत असून कोणीही सहजरित्या डाऊनलोड करू शकतो. येत्या ९ ऑक्टोबरपासून या ॲपवर चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.