मुंबई : तेलंगणाबाहेर पक्ष वाढीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीची राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि सहा विभागांचे समन्वयक जाहीर केले आहेत. अन्य पक्षातून सामील झालेल्या माजी खासदार व आमदारांना पक्षात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीच्या विस्ताराकरिता महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे पक्ष कार्यालये थाटण्यात आली आहेत. अन्यत्र पक्षाचा विस्तार आणि कार्यालये लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पक्षाचे नेते माणिक कदम यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील पक्ष विस्ताराकरिता मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. यात नगर जिल्ह्यातील माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार अण्णासाहेब माने, दीपक आत्राम व शंकरअण्णा धोंडगे, शेतकरी नेते माणिक कदम, ज्ञानेश्वर वाकुडकर, सचिन साठे, सुरेखा पुणेकर, कादिर मौलाना आदींचा समावेश आहे.
विभागीय समन्वयक म्हणून सोमनाथ थोरात (मराठवाडा), निखिल देशमुख (अमरावती), माजी आमदार चरण वाघमारे (नागपूर), नाना बच्छाव (नाशिक), बी. जे., देशमुख (पुणे), माजी आमदार दिगंबर विशे आणि विजय मोहिते (मुंबई व कोकण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.