मुंबई : नागपूरच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीला टायब्रेकरमध्ये हरवून सोमवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या अद्भुत आणि स्वप्नवत कामगिरीच्या जोरावर दिव्याने ‘गँडमास्टर’ हा सर्वोच्च किताबही मिळवला. विश्वचषक जिंकणारी दिव्या विश्वनाथन आनंदनंतरची दुसरी भारतीय, तर ग्रँडमास्टर किताब पटकावणारी केवळ चौथी भारतीय महिला ठरली.

जॉर्जिया येथे स्पर्धेच्या सुरुवातीस दिव्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. परंतु कोनेरु हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली या भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू, किमान अर्धा डझन उत्कृष्ट चिनी प्रतिस्पर्धी, तसेच इतर अनेक देशांच्या दिग्गज बुद्धिबळपटूंच्या गर्दीत दिव्याकडून अजिंक्यपदाच्या अपेक्षा बाळगल्या जात नव्हत्या.

मात्र आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून स्पर्धेत दाखल झालेल्या दिव्याने अखेरच्या चार फेऱ्यांमध्ये जू झिनर (चीन), हरिका  द्रोणवल्ली, तान झोंग्यी (चीन) आणि कोनेरू हम्पी या सर्व ग्रँडमास्टर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत असाधारण सातत्य दाखवले आणि विजयी मानसिकतेचे दर्शन घडवले. हम्पीवरील तिचा विजय विशेष उल्लेखनीय ठरतो. कारण मुख्य लढतीमधील कोंडी फोडण्यासाठी रॅपिड टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि या प्रकारात हम्पी विद्यामान जगज्जेती आहे.

गेल्या वर्षी दिव्याने जागतिक ज्युनियर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. तसेच भारतीय महिला संघाने पुरुषांबरोबरच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, त्या विजयात दिव्याचेही अमूल्य योगदान राहिले. आता विश्वचषक स्पर्धेच्या अजिंक्यपदामुळे ती आणि उपविजेती हम्पी बुद्धिबळ कँडिडेट्स स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले. या स्पर्धेतून चीनची जगज्जेती जु वेनजुन हिची आव्हानवीर ठरवली जाईल. पण मोठ्या स्पर्धांमध्ये तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी खेळण्याचा, त्यांच्याशी जिंकण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे १९ वर्षीय दिव्याकडून या आणि अशा अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा बाळगता येईल.

दिव्यातील गुणवत्ता हेरून तिला गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’ने तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित केले होते.

ही खरेच नियती म्हणावे लागेल, की मला अशा पद्धतीने ग्रँडमास्टर किताब मिळाला. या स्पर्धेपूर्वी मी ग्रँडमास्टर किताबासाठीचा एकही निकष पूर्ण केला नव्हता. मात्र, आता मी ग्रँडमास्टर आहे. मला या कामगिरीचा खूप आनंद आहे. मात्र, अजून खूप काही मिळवण्याचे माझे ध्येय आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. – दिव्या देशमुख

विश्वचषक जिंकल्याबद्दल दिव्याचे अभिनंदन. तिने ग्रँडमास्टर बनण्यासह ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील स्थानही निश्चित केले. हम्पीनेही चांगली कामगिरी केली आणि दिव्यासमोर आव्हान उपस्थित केले. ती गुणी खेळाडू आहे. – विश्वनाथन आनंद, माजी जगज्जेता