मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असली, तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील अनेक भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शिव प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला या भागात पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
शिव प्रतीक्षानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असून संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात या परिसरातील महिलांनी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यासह पालिका मुख्यालयात जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची भेट घेऊन पाण्याची समस्या मांडली. या परिसरात पाण्याचा दाब कमी असल्यामुळे पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागातील नागरिकांना अक्षरश: टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
अंधेरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी दिली. परिसरातील विजयनगर सोसायटी, छत्रपती संभाजी नगर, पार्लेश्वर सोसायटी, पोदारवाडी, कोलडोंगरी या भागांत पाणी कमी येत असल्यामुळे येथील रहिवाशांसह त्यांनीही नुकतीच पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराई भागात नेहमी पाणी कमी दाबाने येते. तिथे आता दिवाळीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
दरम्यान, याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘ऑक्टोबर उष्णता व दिवाळी सणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे, वितरण व्यवस्थेच्या शेवटी असलेल्या भागास (‘फॅग एण्ड’) कमी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याकरिता काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
झडपांचे नियंत्रण बदल करून गोराई परिसरातील पाण्याचा दाब वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून गोराई परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.’ अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील ज्या इमारतींच्या तक्रारी आहेत त्याना मिळणाऱ्या पुरवठ्याचे जलमापक नोंदीनुसार गणन करून दैनंदिन गरजेपेक्षा कमी असल्यास तो सुधारण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सायन प्रतीक्षानगर परिसरात पाणीपुरवठ्याच्या संदर्भात विविध प्रकारची कामे हाती घेतली असून ज्या ज्या इमारतींना पुरवठा कमी होत आहे त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.