जलदगतीने मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर सेल्फी आणि फोटो काढत आनंद घेण्यासाठी आपत्कालीन तळावर तसेच मार्गात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २६४ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिला आहे. दरम्यान, अटल सेतू हा पिकनिक स्पॉट नसल्याचंही मुंबई वाहतूक पोलीस शाखेने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ जानेवारीला या सेतूचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. या पुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनास प्रवेश बंदी आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी वेग-मर्यादा १०० किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही सेतू वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अनेक वाहनचालक त्यांची वाहने अटल सेतूवर उभी करून वाहनातून धोकादायकरीत्या खाली उतरून सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >> अटल सेतूवर २६४ वाहन चालकांवर कारवाई, वाहने उभी करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई वाहतूक पोलिसांनी काय म्हटलं?

वाहनचालकांच्या या कृत्यावर आळा बसावा म्हणून मुंबई वाहतूक विभागाने सोशल मीडियाद्वारेही आवाहन केलं आहे. अटल सेतूचा नजारा पाहण्यालायक नक्कीच आहे, पण या अटल सेतूवर थांबून फोटो काढणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या MHTL वर वाहने थांबून फोटो काढल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असं मुंबई वाहतूक विभागाने सोशल मीडियावर आवाहन केलं आहे. तसंच, २१.८ किमी लांबीचा असलेला हा अटल सेतू पिकनिक स्पॉट नसल्याचंही वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे.

५०० रुपयांचा दंड आकारला

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या १० किलोमीटर ४०० मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. उर्वरीत १० किलोमीटर ४०० मीटर भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. रविवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवासी केवळ सेतू पाहण्यासाठीच तेथून प्रवास करत होते. यावेळी सहकुटुंब आलेले अनेक नागरिक सुरक्षेची, स्वच्छतेची काळजी घेताना दिसत नव्हते. अनेक नागरिक रस्त्याच्या एका बाजूला गाड्या थांबवून सेल्फीचा छंद पूर्ण करताना दिसत होते. पोलिसांनीही अटल सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेक नागरिक वाहन रस्त्याच्या शेजारी थांबवत होते. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी सागरी सेतूवर १२० वाहन चालकांवर कारवाई केली. नवी मुंबई पोलिसांनी १४४ वाहन चालकांवर कारवाई केली. मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहन चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. भविष्यात अशा चालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस विचार करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not stop on atal setu for selfi will get action says mumbai traffice police sgk