मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) झवेरी बाजार येथे छापा टाकून साडे नऊ किलो तस्करीचे सोने, १८ किलो चांदी, सुमारे दोन कोटींची रोख आणि सुमारे दोन लाख अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १० कोटी ४८ लाख रुपये आहे. सोने तस्करीप्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आफ्रिकन नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आल्याचे डीआरआयकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफ्रिका खंडातून तस्करी केलेले सोने मुंबईतील झवेरी बाजार येथे आणून वितळवले जात असल्याची डीआरआयला माहिती मिळाली होती. आफ्रिकेतून तस्करी करून आणलेले सोने वितळवून त्यावरील परदेशी शिक्के काढून ते स्थानिक बाजारात विकले जाते होते. त्यानुसार २२ एप्रिलला डीआरआयने झवेरी बाजार येथे छापा टाकला. यावेळी ९ किलो ३१० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. हे जप्त केलेले सोने वेगवेगळ्या स्वरूपात असून त्यात परदेशातून तस्करी करून आणलेल्या सोन्याचाही समावेश आहे. याशिवाय याप्रकरणी १६ किलो ६६० ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा…पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण, मेअखेरीस काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीबाबत डीआरआयला अधिक माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. या टोळीसाठी तस्करी व सोने वितळवण्यासाठी काही व्यक्ती मदत करत होत्या. ते आफ्रिकेतील नागरिकांशी संपर्क साधून सोने तस्करी करत असत. तस्करी करून जमा केलेले सोने वितळवून त्यावर प्रक्रिया करण्यात येत असे. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत या सोन्याची विक्री करून अधिक नफा कमवला जायचा.

हेही वाचा…पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश

यावेळी आरोपीच्या कार्यालयात टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख ९० हजार अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. सोने खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून परदेशी चलन देण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत दोन आफ्रिकन नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dri seizes smuggled gold and cash worth over 10 crores in mumbai raid mumbai print news psg