मुंबई : गोव्यातील वास्को द गामा ते बिहारमधील मुझफ्फरपूर दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या गाडीचा कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. परंतु, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी या रेल्वेगाडीला जून अखेरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड येथे थांबा असल्याने कोकणवासियांसाठी ती फायदेशीर ठरेल.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. ७ एप्रिल ते ५ जूनच्या कालावधीदरम्यान ही रेल्वेगाडी धावणार होती. परंतु, पावसाळ्यात नियमित प्रवाशांसह पर्यटकांची गर्दी वाढल्याने गाडीच्या सेवेत वाढ केली आहे.गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा ते मुझफ्फरपूर एक्स्प्रेस २ जूनपर्यंत धावणार होती. परंतु, आता ९ ते २३ जूनपर्यंत ही गाडी दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४ वाजता सुटेल.

तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन ते वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ जूनपर्यंत धावणार होती. मात्र, आता १२ ते २६ जूनपर्यंत दर गुरुवारी मुझफ्फरपूर जंक्शनहून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला मडगाव, थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. त्यात द्वितीय श्रेणी वातानुकूलित एक डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलित पाच डबे, शयनयान १२ डबे, जनरेटर कार एक, एसएलआर एक अशी संरचना असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.