“बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढली”; ठाकरे सरकारच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचा संताप, म्हणाले…

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप झाला आहे.

eknath-shinde-Uddhav Thackeray shivsena
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे (संपादित छायाचित्र)

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप झाला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. यात त्यांनी ३८ आमदारांची यादी देत या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं नमूद केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.”

“अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते”

“गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

पत्रात नेमकं काय म्हटलं?

एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, “आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : इतर पक्षात विलीन न होता एकनाथ शिंदे गटाला स्वतंत्र गट म्हणून राहता येईल का?

“आम्ही कोणत्या बाजूचं राजकारण करतो यावर सुरक्षा देण्याचा निर्णय होत नाही”

“आम्हाला सुरक्षा देण्याचं कारण आमच्या जीवाला असलेला धोका आहे. आम्ही कोणत्या बाजूचं राजकारण करतो यावरून सुरक्षा देण्याचा निर्णय होत नाही. असं असलं तरी ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे,” असा आरोप या पत्रात करण्यात आला.

“मविआचे नेते आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत”

या पत्रात पुढे म्हटलं आहे, “पोलीस सुरक्षा काढून आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे. सोबतच मविआचे नेते आपआपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत. याबाबत २३ जूनला माध्यमांमधूनही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संजय राऊत यांनी महाराष्ट्र सोडणाऱ्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्र येणं आणि महाराष्ट्रात फिरणं अवघड जाईल.”

“आमच्या दोन सदस्यांच्या कार्यालयांची तोडफोड”

“या वक्तव्यानंतर आणि आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर काही वेळातच आमच्या दोन सदस्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. असाच महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा प्रकार पंजाबमध्येही झाला होता. त्यानंतर तेथे या व्यक्तींना गुंडांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं. महाराष्ट्रात आमदारांची सुरक्षा काढण्याचे असेच परिणाम होतील,” असंही या पत्रात नमूद करण्यात आलं.

हेही वाचा : “तुम्ही या, आमची पूर्ण तयारी; रस्त्यावर जरी लढाई झाली…”, पवारांसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान

“प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्या”

“प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा द्यायला हवी ती तात्काळ द्यावी,” अशी मागणीही एकनाथ शिंदे गटातील ३८ आमदारांनी केली. तसेच आमच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे असे मविआचे नेते जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde allege removal security of 38 mlas and family pbs

Next Story
“आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने…”; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पोहोचले घरी
फोटो गॅलरी