मुंबई: राज्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध उपाय महत्वाचे आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व पालिका रुग्णालयात महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहिम घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती, त्यांना लागणारी औषधे, साहित्यसामुग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
मंत्रालयातील समिती कक्षात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. राज्यातील महापालिका रुग्णालयामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहिम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहिम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायक, विरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, आरोग्य विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.