मुंबई : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई पोलिसांना ई-मेलबाबत कळवण्यात आले असून या ई-मेलबाबत सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई पोलीस सतर्क झाले असून नागरिकांनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य पोलिसांनी मुंबई पोलिसांना सोमवारी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली. ममता बोरसे नावाच्या ई-मेल आयडीवरून सोमवारी controlroom@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर ई-मेल आला होता. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत तात्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिली. या ई-मेलमध्ये आज, उद्या आणि परवा सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एखादा मोठा स्फोट होऊ शकतो. कुठे आणि कधी स्फोट होणार हे निश्चित नाही. पण लवकरच स्फोट होईल. कृपया दुर्लक्ष करू नका, असा मजकूर ई-मेलमध्ये नमुद करण्यात आला आहे. ऑरेशन सिंदूरनंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. याबाबतची माहिती दक्षिण सायबर पोलिसांना देण्यात आली असून याप्रकरणी ते अधिक तपास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक तपासणी करीत आहे. रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी केली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरिवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली. विशेष करून लांबपल्ल्यांच्या गाड्यांची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके वाजवून नयेत, तसेच रॉकेट उडवून नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून ही बंदी ११ मेपासून ९ जूनपर्यंत आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १० मधील पोटकलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांतर्गत उपायुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत.