मुंबई : सहाशे कोटी रुपयांच्या कूटचलन(क्रिप्टोकरन्सी) गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली, मुंबई आणि जयपूर येथे छापे टाकले. ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत करण्यात आली. संशयीत कूट चलनाचे भारतीय चलनात रूपांतरण आणि भारतीय कूट चलन एक्सचेंजच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडीने एका वृत्तपत्राच्या अहवालावर आधारित तपास सुरू केला. त्यानुसार चिराग तोमर सध्या अमेरिकेत २० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीसाठी तुरुंगवास भोगत आहे. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कॉईनबेस कूट चलन एक्स्चेंजची हुबेहूब नक्कल असलेले कॉईनबेसप्रो नावाचे बनावट संकेतस्थळ तयार केले होते. त्यावर कूट चलन धारकाने लॉगिन करण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्रुटी दाखवण्यात यायच्या. त्यानंतर संबंधीत व्यक्ती संकेतस्थळावर दिलेल्या मदत क्रमांकावर संपर्क साधायचा. तो दूरध्वनी तोमर चालवत असलेल्या कॉल सेंटरला जायचा. त्यानंतर कूट चलना धारकाकडून गोपनीय माहिती मिळवून आरोपी संबंधीत व्यक्तीच्या कूटचलन वॉलेटमध्ये प्रवेश करायचे व त्यानंतर संबंधीत कूट चलन इतर ठिकाणी हस्तांतरीत केले जायचे. अशा प्रकारे आरोपीने जगभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

फसवणूकीतून मिळालेले कूट चलन इतर एक्स्चेंजच्या माध्यमातून विकले जायचे. त्यानंतर भारतीय कूटचलन एक्स्चेंजच्या माध्यमातून संबंधीत रक्कम भारतीय चलन म्हणजेच रुपयांमध्ये रुपांतरीत केली जायची. या प्रकरणातून सुमारे १५ कोटी रुपये मिळवण्यात आले असून त्यातील काही रक्कम तोमरच्या कुटुंबीयांकडे वर्ग झाल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. याप्रकरणी ईडीने तोमरच्या कुटुंबिय व साथीदारांची बँक खाती गोठवली आहेत. याप्रकरणात आतापर्यंत दोन कोटी १८ लाख रुपये गोठवण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारच्या फसवणुकीद्वारे संशयास्पद कूट चलन विक्री आणि रुपयांमध्ये रूपांतरित करण्याचे व्यवहार सुरू होते, अशी माहिती ईडीला छाप्यांदरम्यान मिळाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये चिराग तोमरला अटलांटा विमानतळावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याने २० मे २०२४ रोजी हा गैरव्यवहार केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याला फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्सच्या ताब्यात ठेवण्यात आले. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत असून गैरव्यवहारातील रकमेचे लाभार्थी व रकमेची माहिती घेतली जात आहे. काही महत्त्वाचे पुरावे या छाप्यांदरम्यान ईडीच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे अधिक तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate conducted raids in delhi mumbai and jaipur in connection with cryptocurrency fraud worth rs 600 crore mumbai print news sud 02