बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश; गांधी, पारेख, श्रीवास्तव बनले तडवी, धोडिया, टाकनकार
जे.जे., केईएम, नायर, सायन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या मुंबई व कोल्हापूर येथील नामांकित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस व बीडीएसच्या अनुसूचित जमातीकरिता (एसटी) राखीव असलेल्या जागांवर गेली चार वर्षे अनेक खुल्या वर्गातील विद्यार्थी बोगस जात आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गांधी, पारेख, श्रीवास्तव, पुरोहित, रेशमवाला आदी मूळ आडनाव असलेल्या विद्यार्थ्यांनी तडवी, धोडिया, टाकनकार, भिल्ल या आदिवासी समाजाचे बोगस जात प्रमाणपत्र दाखवीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील तब्बल १९ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. आणखीही विद्यार्थ्यांनी या कोटय़ातील जागांवर डल्ला मारल्याचा संशय आहे. पण गंभीर बाब म्हणजे या प्रकाराची वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
या विद्यार्थ्यांनी मुंबई शहर, धुळे, जळगाव, बीड, जळगाव येथून जातीची प्रमाणपत्रे मिळविल्याचा दावा केला आहे. मात्र माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असता विसंगती समोर आली आहे. उदाहरणार्थ, मुंबई शहर जिल्ह्य़ातून जातीचा दाखला मिळविणाऱ्या नुअमन मन्सुरी अब्दुल सत्तार मन्सुरी, आगमी फातिमास, इस्तेवाक, फय्याज भाई अमिभाई नोदोलिया, बिपीन हवासिंग ब्लोवडा यांचे जातीचे दाखले उपजिल्हाधिकारी धारावी क्षेत्र मुंबई शहर यांनी दिल्याचे नमूद आहे. पण शिक्का मात्र उपजिल्हाधिकारी असा आहे.
..तर प्रवेश रद्द
सदानंद गावित यांनी या प्रकाराची तक्रार संबंधित महाविद्यालयांबरोबरच प्रवेश करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडेही केली होती. संचालनालयाने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही दाखल करून घेतो, असे लेखी पत्राद्वारे स्पष्ट करत महाविद्यालयांनी जबाबदारी ढकलली आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी अशी कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचा दावा केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश केले असतील तर ते प्रवेश रद्द होतील, असेही स्पष्ट केले आहे.
जागा कोणत्या?
यातील बहुतांश म्हणजे ९ जागा भायखळ्याच्या ग्रँट मेडिकल कॉलेज (अर्थात जेजे) या देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सरकारी महाविद्यालयातील आहेत. त्या खालोखाल सायनचे पालिकेचे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (३), मुंबई सेंट्रलचे नायर दंत वैद्यकीय महाविद्यालय (२) आणि विलेपाल्र्याचे एच.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय (कूपर) (१), परळचे सेंट जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय-केईएम (१), बा. य. ल. नायर वैद्यकीय महाविद्यालय (१) आणि कोल्हापूरमधील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (२) २०१२ ते २०१५ या वर्षांमध्ये हे प्रवेश झाले आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. परंतु मागास जाती-जमातींकरिता राखीव असलेल्या कोटय़ातील प्रवेशाचा कटऑफ तुलनेत कमी असतो. त्यामुळे हा मार्ग वापरला आहे.