मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वसई, मुंबई सेंट्रल येथील रेल्वे पोलीसद्वारे प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार घडले. तर, पुन्हा एकदा वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका व्यापाऱ्यांची १० लाख ३० हजार रुपये लाटण्याची घटना घडली. मात्र, हे पोलीस तोतये असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आरोपी निलेश कळसुलकर (४५) आणि प्रवीण शुक्ला (३२) यांना अटक केली आहे. तसेच रेल्वे पोलिसांद्वारे पुढील तपास सुरू आहे.

मालाड येथे राहणारे तक्रारदार विकास गुप्ता हे व्यावसायिक आहेत. त्याचे कपड्यांचे दुकान असून कपड्यांची खरेदी करण्यासाठी सोमवारी गुजरातकडे रवाना होत होते. यावेळी गुजरातला जाणारी रेल्वेगाडी पकडण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आले. वांद्रे टर्मिनस येथील रेल्वे कॅन्टीनजवळ उभे राहिले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून, कुठे जात आहेत, बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली.

अनोळखी व्यक्तींनी बॅगेची पाहणी केली असता, त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याबाबत गुप्ता यांच्याकडे विचारणा केली. तसेच रोख रक्कम गुप्ता यांचीच आहे, त्याचा पुरावा दाखविण्यास सांगितले. परंतु, त्यावेळी कोणताही पुरावा नसल्याने गुप्ता घाबरून गेले. अनोळखी व्यक्तींनी रोख रक्कम घेऊन रक्कम पुन्हा मिळणार नसल्याचे सांगितले. काही वेळानंतर गुप्ता यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलीस असल्याची बतावणी करून तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात खरे रेल्वे पोलीस समाविष्ट आहेत की नाही, हे तपासातून उघड होईल. तक्रारदारांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. – सुनीता ठाकरे, पोलीस उपआयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग पोलीस

बनावट रेल्वे पोलिसांशी हातमिळवणी केल्याचा संशय

या घटनेत वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रेल्वे पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या खार रोड रेल्वे स्थानक, वांद्रे टर्मिनसवरून महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बॅग घेऊन जाताना सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसल्या आहेत.