मुंबई : राज्यात कापूस खरेदीसाठी राष्ट्रीय कापूस महामंडळाकडून(सीसीआय) राज्यात सुरू करण्यात आलेली खरेदी केंद्र आणि व्यापारी यांच्याकडूनच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची कबुली पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत अमित झनक, रोहित पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, हरिष पिंपळे आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान रावळ बोलत होते. राज्यात राष्ट्रीय कापूस महामंडळाची १ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. दरवर्षी साधारणत: ११० कापूस खरेदी केंद्र असतात, मात्र यंदा १२४ केंद्रांवरून आतापर्यंत १० हजार कोटींचा १४२.६९ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मात्र या खरेदी प्रक्रियेत जिनिंग मिल्स आणि सीसीआय केंद्र संगनमताने शेतकऱ्यांची पिळवणूक करतात.

चांगला कापूस व्यापाऱ्यांना तर कमी प्रतीचा कापूस सीसीआय खरेदी करते. मध्यंतरी सीसीआयची कापूस खरेदीची ऑनलाइन प्रणालीच हॅक करण्यात आल्यामुळे पंधरा दिवस ही केंद्रे बंद होती, त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहिला असेल तो खरेदी करण्यासाठी सीसीआयला विनंती करणार असल्याचे रावळ यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याच्या कापूस खरेदी योजनेत अनेक त्रुटी असून पुढील हंगामापूर्वी या त्रुटी दूर केल्या जातील. त्यानुसार या योजनेत पारदर्शकता आणण्यात येणार असून त्यासाठी लवकरच आमदारांची बैठक घेणार असल्याचेही रावळ यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers are being exploited by the cotton purchasing center itself panan minister admits mumbai print news ssb