मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागलीय. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्य आहेत. ही आग इतकी मोठी आहे की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. या आगीत कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. याशिवाय या ठिकाणी अनेक कामगार देखील काम करत होते.

ही आग संपूर्ण सर्व्हिस सेंटरमध्ये पसरलीय. आजूबाजूला अनेक रहिवासी इमारती देखील आहेत. त्यामुळे या आगीचा फटका आजूबाजूच्या इमारतींना लागू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.

शोरूममधील गाड्यांच्या इंधनाचाही भडका?

ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरसोबतच इथं गाड्यांचं शोरूम देखील आहे. त्यामुळे अनेक महागड्या गाड्या या ठिकाणी होत्या. त्यातच या गाड्यांमध्ये असलेल्या इंधनामुळे आगीचा भडका उडाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. या ठिकाणी काम करणारे कामगार देखील तेथे अडकल्याची भीती वर्तवली जातेय. त्यात हा भाग दाटीवाटी आणि गर्दीचा असल्यानं अग्निशमन दलाला मार्ग काढत आगीच्या घटनास्थळावर पोहचण्यात अडथळे येत असल्याचंही पाहायला मिळालं.

हेही वाचा : आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयांत निधीअभावी अग्निशमन यंत्रणा नाही!

धुराचे लोट जवळील निवासी इमारतींमध्ये घुसले

याशिवाय आगीची तीव्रता मोठी असल्यानं धुराचे मोठमोठे लोट या शोरूमच्या जवळील निवासी इमारतींमध्ये घुसत आहेत. त्यामुळे या रहिवासी इमारतीतील नागरिकांना तिथून बाहेर काढलं जातंय. एकूणच ही आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in hyundai motor service centre in powai mumbai pbs