मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांच्या पुनर्विकासाचे काम सार्वजनिक – खासगी – भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर वेगाने सुरू आहे. त्यापैकी गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासाबरोबरच तेथे वैद्यकीय महाविद्यालयही उभारण्यात येणार असून, यासंदर्भात काढलेल्या निविदा प्रक्रियेअंतर्गत फक्त एकाच कंपनीने स्वारस्य दाखविले आहे. शताब्दी रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रशासनाकडून पीपीपी तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत एका कंपनीने महाविद्यालय उभारण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे शताब्दी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पूर्व उपनगरातील हे पहिले आणि शहरातील सातवे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे. शताब्दी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण ५८० खाटा असणार आहेत. यापैकी ७० खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी, तर ३० खाटा महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयातील संदर्भित रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व उपनगरातील मानखुर्दपासून कुर्ल्यापर्यंत आणि घाटकोपर, विद्याविहारमधील नागरिकांना आरोग्यविषयक उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच शीव, राजावाडी व केईएम आणि जे.जे रुग्णालयांवरील रुग्णांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असले तरी त्याच्यावर महानगरपालिका देखरेख ठेवणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाविद्यालय सुरू होण्यास पाच वर्षे लागणार

शताब्दी रुग्णालयाचा पुनर्विकास लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्याशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरामध्ये राजावाडी हे प्रमुख रुग्णालय असले तरी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक जागेची अडचण या रुग्णालयामध्ये उद्भवत आहे. मात्र राजावाडी रुग्णालयामध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याने तेथील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास मदत होत आहे. राजावाडीच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत असलेली वैद्यकीय महाविद्यालये

मुंबईमध्ये राज्य सरकारची दोन वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात जे.जे. रुग्णालय आणि जी.टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा त्यात समावेश आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये असून, यामध्ये केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयांचा समावेश आहे.