‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सज्जतेची आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मार्गिकेची सुरक्षा चाचणी अद्यापही सुरू आहे. पुढील आणखी काही दिवस ही चाचणी सुरू राहणार आहे. या चाचणीअंती सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या कामाची पाहणी करण्यासाठी मेट्रोतून सफर केली. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे अशा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेचा हा टप्पा असून हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानुसार मागील १० ते १२ दिवसांपासून आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून टप्प्याटप्प्याने सुरक्षा चाचणी सुरू आहे. अजूनही ही चाचणी सुरू असून लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी या वेळी दिली. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिन्याभरात पहिला टप्पा सुरू होईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
२० किमीचा पहिला टप्पा एकत्रित सुरू
दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील २० किमीचा पहिला टप्पा एकत्रित सुरू होणार आहे. या दोन वेगवेगळय़ा मार्गिका असल्या तरी त्यांचा रूळ आणि टर्मिनल स्थानक एकच आहे. आरे हे टर्मिनल स्थानक आहे. त्यामुळे आरे मेट्रो स्थानक आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातून मेट्रो गाडय़ा सुटणार आहेत.
पहाटे पाच ते रात्री साडेअकरादरम्यान सेवा
वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. पहाटे पाच ते रात्री साडेअकरादरम्यान या मार्गिकेवरील वाहतूक सुरू राहणार आहे. यासाठीचे मनुष्यबळही भरती करण्यात आले आहे. आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत उर्वरित टप्पा सुरू करण्यात येईल, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.