काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.

राऊत म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती त्यात आता फाटाफूट झालेली आहे. आम्ही महाशिवआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेलं नाही. त्यामुळे या नव्या आघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या नव्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असून जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार येणार असेल तर हिंदुत्व त्याच्या आड येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप करताना भाजपावरही त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली. भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही तसेच मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत भाजपा इतरांना सत्ता स्थापन करु देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. मध्यवधी निवडणुकांची चर्चा केवळ अफवा असून त्या पसरवण्याचे बंद करा असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.

कामाची सवय असेल तर स्वस्थ बसवत नाही त्यामुळे आजही रुग्णालयातून नेहमीप्रमाणे अग्रलेख लिहिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयातून डिस्जार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे ते यावेळी म्हणाले.