मुंबई : जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली, रस्त्यामध्ये अपघात झाला की नागरिकांकडून तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिका बोलविण्यात येते. मात्र बऱ्याचदा ही रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहोचली हे समजत नसल्याने नागरिकांची चिंता वाढते, रुग्णाची प्रकृती खालावण्याची भीती वाढते. यापुढे मात्र रुग्णवाहिका शक्य तितक्या लवकर उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मार्च २०२५ पासून नव्या स्वरूपात येणारी ‘१०८ रुग्णवाहिका’ मोबाइल अॅपवरही उपलब्ध असेल. या अॅपवरून रुग्णवाहिका बोलविल्यास ती कुठपर्यंत आली याची माहिती सहज उपलब्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णाला वैद्याकीय आणीबाणी प्रसंगी रुग्णालयात नेण्यासाठी राज्यभरात १०८ रुग्णवाहिका फार मोलाची भूमिका बजावत आहे. मात्र बऱ्याचदा १०८ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर ती नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तिला पोहोचायला किती वेळ लागेल हे समजत नसल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकेची वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेत १०८ रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हावी यासाठी मार्च २०२५ पासून मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अॅपवरून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेच्या चालकाचा किंवा त्यातील डॉक्टरचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहोचली, किती वेळात पोहोचणार आहे, याची अचूक माहिती ओला, उबर या अॅपप्रमाणे मोबाईलवर दिसणार आहे. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध होणार असल्याने रुग्णवाहिका चालक किंवा डॉक्टरशी थेट संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास एक ते दोन मिनिटे लागणार असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईक रुग्णाला घरातून बाहेर आणू शकतील, जेणेकरून वेळेची बचत होण्यास मदत होईल.

हेही वाचा…Salman Khan gets Threat: “जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

वैद्याकीय आणीबाणीच्या काळामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची पत्ता सांगण्याची मानसिकता नसते. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केल्यावर किंवा मोबाईल अॅपवरून रुग्णवाहिका बोलविल्यास संबंधित व्यक्तीचे ठिकाण अवघ्या १५ सेकंदात लोकेशन बेस्ड सर्व्हिसमुळे आपत्कालीन प्रतिसाद केंद्राला उपलब्ध होणार आहे. तेव्हा यापुढे १०८ रुग्णवाहिका बोलविताना रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा संबंधित व्यक्तीला पत्ता सांगावा लागणार नाही.

अॅपवर रुग्णालये

एखाद्या व्यक्तीला रस्त्याने जात असताना काही वैद्याकीय समस्या उद्भवल्यास त्याला मोबाईल अॅपवर जवळील सरकारी रुग्णालयाची माहिती उपलब्ध होणार आहे. जेणेकरून तो त्या ठिकाणी पोहोचून उपचार घेऊ शकतो. तसेच भविष्यात यामध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा…दिवाळीनंतर प्रचाराचा नारळ अनेकांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; घरोघरी जाऊन मतदार भेटीवर उमेदवारांचा भर

नैसर्गिक आपत्तीची माहिती

मोबाईल अॅप वापरणारा व्यक्ती ज्या परिसरात आहे तेथे काही नैसर्गिक आपत्ती घडल्यास त्याची माहिती तात्काळ त्या व्यक्तीला संदेशाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे ती व्यक्ती सतर्क होण्यास मदत होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From march 2025 new 108 ambulance available on mobile app mumbai print news sud 02