मुंबई : मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्षे जगू शकेल, असे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईने म्हटले होते. त्याची प्रचिती येऊ लागली आहे. मधमाशांअभावी डाळिंब, मोसमी आणि शेवगा उत्पादनात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात कृत्रिम मधपेट्या ठेवाव्या लागत आहेत. रसायनांचा अतिरेकी वापर थांबला नाहीतर अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.
जगभरात जास्तीत – जास्त कृषी उत्पादनासाठी संकरीत बियाणे, कीडनाशके आणि रसायनांचा अतिरेकी वापर सुरू आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. राज्यात यंदा प्रथमच डाळिंबाला मोठा फटका बसला असून, उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. डाळिंब उत्पादकांना कृत्रिम मधपोट्यांची गरज भासत आहे. डाळिंबाला प्रति एकर एक ते पाच मधपेट्या ठेवाव्या लागत आहेत. डाळिंबाच्या बागेत परागीभवनासाठी म्हणजे फुलांपासून फळधारणा होण्याची प्रक्रिया होण्याठी मधमाशांना पर्याय नाही. पण, डाळिंब पिकावरील कीड, कीटक आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरेकी कीडनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे डाळिंब बागेत रसायनांचा वास भरून राहतो किंवा मधमाशांना हानिकारक ठरणारा वायू तयार होतो. त्यामुळे मधमाशा डाळिंबाच्या बागेत येत नाहीत. त्यामुळे शेतकरी कळी, फुलोरा असतानाच्या काळात कीडनाशकांची फवारणी टाळत आहेत. मधमाशांना आकर्षिक करण्यासाठी गूळ आणि ताकाच्या मिश्रणाची फवारणी करीत आहेत, अशी माहिती पैठण येथील प्रयोगशील शेतकरी यज्ञनेश कातबने यांनी दिली.
सांगोला डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील तरुण शेतकरी दत्तात्रय येलपले म्हणाले, प्रति एकर बारा ते तेरा टन डाळिंब उत्पादन होत होते. गत काही वर्षांपासून मधमाशाअभावी अपेक्षित फळधारणा होत नसल्यामुळे प्रति एकर उत्पादन सात ते आठ टनांवर आले आहे. दरवर्षी फुलोऱ्याच्या काळात भाड्याने मधपेट्या ठेवाव्या लागत आहेत. तरीही अपेक्षित फळधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे मधमाशांना अपाय होणाऱ्या कीडनाशकांची फवारणी न करणे, बांधांवर फळे, फुलांची लागवड करणे, जैविक खते, कीडनाशकांची फवारणी करणे, अशी उपाययोजना करावी लागत आहे.
आंबा, मोसंबी, टरबूज, खरबूज, शेवग्याला फटका
गत काही वर्षांपासून डाळिंब, मोसमी, टरबूज, खरबूज आणि शेवगा पिकांचे उत्पादन मधमाशांअभावी अडचणीत आले आहे. डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. इंदापूर, सांगोला, अहिल्यानगर भागात डाळिंब, कांदा बीजोत्पादनसाठी जालना, टरबूज, खरबूज पिकासाठी तेलंगाणा आणि नांदेड. शेवगा पिकासाठी धुळे, चाळीसगाव आणि मोसबीसाठी पैठण, पाचोड, अबंड येथून मधपेट्यांना मागणी वाढली आहे. एका मधपेटीत वीस ते पंचवीस हजार मधमाशा असतात. एका पोटीला एक महिन्याला दोन हजार रुपये भाडे असते. वरील फळे आणि भाजीपाला पिकांत मकरंद कमी आणि परागकण जास्त असल्यामुळे फारसा मध मिळत नाही. त्यामुळे भाडे जास्त घेतले जाते. टरबूज पिक नांदेड, तेलंगाणात वर्षभर घेतले जाते, त्यामुळे या भागातून वर्षभर मागणी असते. शेवग्याच्या शेतीला मधपेट्यांशिवाय पर्याय राहिला नाही, अशी माहिती लातूर येथील मधपाळ दिनकर पाटील यांनी दिली.