मुंबई: गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कचराच कचरा दिसू लागला आहे. भरती ओहोटीमुळे नदी नाल्यातील सगळा कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला जात असून गेल्या आठ दिवसात मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने तब्बल ९५२ मेट्रीक टन कचरा हटवला आहे. मुंबईकरांनी नाल्यात, गटारात फेकलेला कचरा समुद्राने मुंबईलाच साभार परत केला आहे.
मुंबईत गेल्या आठवड्यात १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा कचरा हटवण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. दिनांक १५ ते २३ ऑगस्ट या आठ दिवसांच्या काळात एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला आहे. सुमारे ३८० कर्मचाऱ्यांनी एकूण ६ संयंत्रांच्या सहाय्याने चोवीस तास राबून हे सहा समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.
मुंबईत दररोज सुमारे सहा हजार मेट्रीक टन कचरा तयार होत असतो. पावसाळ्याच्या काळात कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. तसेच समुद्र किनाऱ्यावरही भरतीमुळे कचरा किनाऱ्यावर फेकला जात असतो. मुंबईत दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या समुद्रकिनाऱ्यांवरून २३ ऑगस्टपर्यंत एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला.
समुद्रकिनाऱ्यांवर करण्यात आलेली स्वच्छता आणि मनुष्यबळ
• गिरगाव चौपाटी – २३ मेट्रिक टन (१६ मनुष्यबळ आणि १ संयंत्र)
• दादर-माहीम – ३०० मेट्रिक टन (४८ मनुष्यबळ आणि १ संयंत्र)
• वेसावे – २०० मेट्रिक टन (१२० मनुष्यबळ आणि १ संयंत्र)
• जुहू – ३७५ मेट्रिक टन (१५० मनुष्यबळ आणि १ संयंत्र)
• मढ-मार्वे – ३४.५ मेट्रिक टन (३५ मनुष्यबळ आणि १ संयंत्र)
• गोराई – २० मेट्रिक टन (१४ मनुष्यबळ आणि १ संयंत्र)