मुंबई : शिवडी येथे सराफाच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सव्वादोन कोटी रुपयांचे सोने लुटण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आर. ए. के मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मास्टरचेन अँड ज्वेल्स’ कंपनीतील कर्मचारी शामलाभाई होथीभाई रबारी (३१) आणि त्यांचा सहकारी जगदीश हे हॉलमार्किंगसाठी नेलेले सोन्याचे दागिने परत घेऊन येत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. मागे बसलेल्या इसमाने पिस्तूलने धमकावत जगदीश यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग हिसकावून घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिक भीतीने पळू लागले. त्यानंतर दोन्ही दरोडेखोर मोटरसायकलवरून फरार झाले. लुटून नेलेल्या सोन्याचे वजन सुमारे २,०६७ ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे २ कोटी २९ लाख रुपये इतकी आहे.
सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे शोध या प्रकरणी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत. या कर्मचाऱ्यांनी आरोपींचे वर्णन पोलिसांना सांगितले असून आम्ही सर्व शक्यता तपासून या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.