मुंबई : अस्सल मराठमोळा उत्सव अशी ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचे स्वरुप देण्यात येत असून त्यानिमित्ताने प्रो – गोविंदाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना परराज्यांतील शहरांची नावे देण्यात आल्याबद्दल गोविंदांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यंदा प्रथमच मराठमोळ्या गोविंदा पथकांना दिल्ली, सुरत, जयपूर, बंगळूरू, हैदराबाद, गोवा, वाराणसी, लखनऊ या शहरांचीही नावे देण्यात आली आहेत.
‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे पहिलेवहिले पर्व २०२३ साली पार पडले होते. त्यानंतर या रोमहर्षक स्पर्धेला नवीन स्वरूप देत दुसऱ्या पर्वापासून म्हणजेच २०२४ पासून गोविंदा पथकांच्या संघांसाठी व नावांसाठी संघ बोली कार्यक्रमालाही सुरुवात झाली होती. गतवर्षी अंतिम फेरीत पोहचलेल्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील १६ गोविंदा पथकांना महाराष्ट्रातील विविध शहरांची नावे देण्यात आली होती. मात्र यंदा राज्याबाहेरील दिल्ली इगल्स, सुरत टायटन्स, जयपूर किंग्स, बंगळूरू ब्लेझर्स, हैदराबाद डायनामोज, गोवा सर्फर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, लखनऊ पँथर्स अशी नावे देण्यात आली आहेत. यंदा पथकांना महाराष्ट्रातील ८ शहरे आणि राज्याबाहेरील ८ शहरांची नावे देण्यात आली आहेत.
दरम्यान, ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी २८ व २९ जून रोजी ठाणे (पश्चिम) येथील दिवंगत बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे पार पडली. या फेरीतून एकूण १६ गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या संघांसाठी व नावांसाठी संघ बोली कार्यक्रम (टीम ऑक्शन) वांद्रे – कुर्ला संकुलातील सोफीटेल येथे नुकताच पार पडला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील १६ गोविंदा पथकांमध्ये वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम फेरी रंगणार असून विजेत्यांना एकूण दीड कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
‘विविध संघांसाठीची स्पर्धात्मक बोली (टीम ऑक्शन) ही ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. जागतिक क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्यामुळे स्पर्धेला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. युवा गोविंदांना करिअरची संधी देऊन महाराष्ट्राचा हा वारसा देशात आणि जगात पोहोचवणे हा आमच्यासाठी, तसेच स्पर्धेच्या दृष्टीने एक अभिमानाचा व महत्वाचा टप्पा आहे’, असे ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.
‘प्रो – गोविंदा’ दुसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीतील संघांची नावे
कोकण जायंट्स, सातारा सिंघम, लातूर लिजेंड्स, नाशिक चॅलेंजर्स, छत्रपती संभाजीनगर वॉरिअर्स, रायगड रॉयल्स, सेंट्रल मुंबई, नवी मुंबई स्ट्रायकर्स, मीरा – भाईंदर योद्धाज, पुणे पँथर्स, अमरावती ग्लॅडिएटर्स, कोल्हापूर किंग्स, नागपूर निन्जास, ठाणे टायगर्स, बारामती ब्लास्टर्स, वेस्टर्न मुंबई.
‘प्रो – गोविंदा’ तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीतील संघ व त्यांची नावे
१) आर्यन्स गोविंदा पथक : नागपूर निन्जास
२) बाल उत्साही गोविंदा पथक, जोगेश्वरी : अलिबाग नाईट्स
३) संभाजी क्रीडा मंडळ : शूर मुंबईकर
४) संत नगर गोविंदा पथक : ठाणे टायगर्स
५) विघ्नहर्ता गोविंदा पथक : मिरा भाईंदर लायन्स
६) यश गोविंदा पथक : नाशिक रेंजर्स
७) अष्टविनायक क्रीडा मंडळ : दिल्ली इगल्स
८) साई राम गोविंदा पथक : सुरत टायटन्स
९) शानदार गोविंदा पथक : जयपूर किंग्स
१०) अखिल मालपा डोंगरी क्र. १, २, ३ मित्र मंडळ गोविंदा पथक : बंगळूरू ब्लेझर्स
११) शिवटेकडी गोविंदा पथक : हैदराबाद डायनामोज
१२) शिवसाई क्रीडा मंडळ : गोवा सर्फर्स
१३) ओम ब्रम्हांड साई गोविंदा पथक : वाराणसी महादेव असेंडर्स
१४) शिवनेरी गोविंदा पथक : लखनऊ पँथर्स
१५) हिंदुराज गोविंदा पथक, दापोली : नवी मुंबई स्ट्रायकर्स
१६) शिव गणेश मित्र मंडळ : मुंबई फाल्कन्स योद्धाज