मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली असून मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरवर्षी १ ऑक्टोबरला धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा तरी मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. ऑक्टोबर महिन्यातही पावसाची शक्यता असून हा पाऊस म्हणजे मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याचा बोनसच ठरणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत २ ऑक्टोबर रोजी ९८.८२ टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून मुंबईला दर दिवशी ४००० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्याचे चार महिने पूर्ण झाले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. यंदा ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला धरणे काठोकाठ भरली असल्यामुळे पाणीपुरवठ्याची चिंता मिटल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ऑक्टोबरमधील पाऊस फायद्याचा

मुंबईला पाणीपुरवठ्यासाठी सध्या सात धरणांतील पाणीसाठ्यावर भिस्त आहे. सगळी धरणे कठोकाठ भरली तरी गेली सलग तीन वर्षे मुंबईकरांवर पावसाळ्याच्या आधी पाणी कपात लागू करण्याची किंवा राखीव साठा वापरावा लागला. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडत असल्यामुळे त्याचा मुंबईकरांना चांगलाच फायदा होतो आहे. धरणातील एकूण साठ्यापैकी सुमारे ११ ते १२ टक्के पाणी एका महिन्याला लागते. ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू राहिल्यास सुमारे २० दिवसांचा पाणीसाठा किंवा पाच ते सात टक्के पाणीसाठा अधिकचा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यातही धरणात पाणीसाठा शिल्लक राहतो. तसेच राखीव साठा वापरण्याची वेळ येत नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पाऊस पडल्यास तो मुंबईकरांसाठी मोठा दिलासाच असतो, असे मत मुख्य जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी व्यक्त केले आहे.

गेल्यावर्षी राखीव साठा वापरावा लागला नाही

गेल्यावर्षी पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होता. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने उन्हाळ्यात राखीव साठ्याचा वापर करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घेतली होती. भातसामधून १ लाख ११ हजार दशलक्ष लीटर आणि उर्ध्व वैतरणा धरणातून ६७ हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा मंजूर करून घेतला होता. पण यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे उर्ध्व वैतरणा धरणातून केवळ २००० दशलक्ष लीटर साठा वापरला. तर भातसा धरणातील पाणीसाठा वापरण्याची वेळच आली नाही, अशी माहिती माळवदे यांनी दिली.