मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत  ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, यंदा पावसाचा लंपंडाव लक्षात घेता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या जलभियंता विभागाकडून सांगण्यात आले होते. गुरुवापर्यंत धरणांमधील जलसाठा काही प्रमाणात आटला होता. जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा व मोडकसागर हे चार तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. मात्र, विहार वगळता इतर तलावांची पाणीपातळी पुन्हा खालावली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली. मात्र, गुरुवारी पहाटेपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा >>> Weather Update: राज्यात सर्वदूर पाऊस; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

हेही वाचा >>> वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

गुरुवारी पहाटेपर्यंत ९०.३७ टक्के असणारा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे ९३.१७ टक्क्यांवर पोहोचला. तलावांमध्ये सध्या १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तानसा व तुळशी पुन्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. तर, मध्य वैतरणा भरण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीकपातीची शक्यता कमी होऊ शकेल. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains the water storage in the dams water supply to mumbaikars has increasing mumbai print news ysh