Mumbai Weather Today: मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर पुढील १ ते २ तास सुरूच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः ठाणे आणि मुलुंड परिसरात पुढील काही तास जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचून वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे.
मागील तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचबरोबर गुरुवारी मध्यरात्रीपासून शहर तसेच उपनगरात पाऊस पडत आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, पुढील १-२ तास पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
अंधेरी सब वे बंद
मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मागील १२ तासांत मुंबईत झालेला पाऊस
नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र – १०.२ मिमी
सी वॉर्ड – १२.१६ मिमी
मेमनवाडा अग्निशमन केंद्र – १४.७१ मिमी
शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा- ४२ मिमी
नाडकर्णी पार्क महानगरपालिका शाळा- ४८.८ मिमी
रावळी कॅम्प – ५१.२८ मिमी
चेंबूर अग्निशमन केंद्र – ४२.६ मिमी
टागोर नगर – ६४.८ मिमी
मिठानगर महानगरपालिका शाळा- ५४.८ मिमी
टेंभीपाडा भांडूप- ६४.२ मिमी
मरोळ अग्निशमन केंद्र – ६०.९४ मिमी
चकाला अंधेरी – ६३.४ मिमी
कमी दाब क्षेत्र
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामान प्रणाली ठळक होण्याची शक्यता असून, पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, सिरसा, मेरठ, पाटणा, जमशेदपूर, दिघा येथे आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
शनिवारी मोठी भरती
समुद्राला शुक्रवारी आणि शनिवारी मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. समुद्राला गुरुवार, २६ जुलै रोजी सर्वात मोठी भरती येणार असून ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत.