मुंबई : दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. गणेश शहा (४०) असे या पादचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार फरारी झाला असून सांताक्रूझ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गणेश शहा (४०) पत्नी आणि तीन मुलांसह सांताक्रूझ येथे वास्तव्यास होता. तो शुक्रवारी (१ ऑगस्ट) रोजी सकाळी कामानिमित्त बाहेर गेला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास तो जुहू तारा रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना जुहू कोळीवाड्याच्या दिशेने पश्चिम वाहिनीवरून भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारसायकलने त्याला धडक दिली.
या अपघातात गणेश जखमी झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला. शहा याची पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत दुपारचे ३ वाजले होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्याला दुसऱ्या दिवशी केईएममध्ये नेण्याचा निर्णय घेतला.
त्या दिवशी सायंकाळी ६ वाजता शहा याला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गणेश हा नळ दुरूस्तीचे (प्लंबर) काम करीत होता.
फरारी दुचाकीस्वाराचा शोध सुरू
सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) (दुर्लक्षामुळे मृत्यू), १२५ (इतरांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका पोहोचविणारी कृती), २८१ (सार्वजनिक मार्गावर बेधडक वाहन चालवणे) आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.
‘हिट ॲण्ड रन’च्या वाढत्या घटना
अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या (हिट ॲण्ड रन) घटनांमध्ये वाढ होत आहे. ही समस्या अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये, प्रामुख्याने रस्त्यांवरील गर्दी, वेग, आणि वाहतूक शिस्तीचा अभाव मोठ्या प्रमाणावर आढळतो, तेथे असे अपघात होत असतात. मुंबईत दरवर्षी १०० हून अधिक अपघात ‘हिट ॲण्ड रन’चे असतात. मुंबईत २०२४ मध्ये ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात ९० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबईत २०२३ मध्ये झालेल्या ३५१ अपघातात ३७४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ३८ टक्के मृत्यू हे ‘हिट ॲण्ड रन’ प्रकारातील होते. या अपघातांत मृत्युमुखी पडणारे ५४ टक्के पादचारी होती. हिट ॲण्ड रनच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आरोपी वाहनचालकांचा शोध लागत नाही.