मुंबई : जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर भूखंडावर मुला-मुलींसाठीचा वसतिगृह बांधण्याचा संकल्प म्हाडाने सोडला होता. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडले होते. अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने वसतिगृहाच्या कामाला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण, तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींना निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत दोन वसतिगृह बांधण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला होता. यापैकी एक वसतिगृह जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर बांधण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाला फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरुवात करण्यात येणार होती. कामाचे कार्यादेशही जारी करण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आणि भूमीपूजनासाठी मुहूर्त न मिळाल्याने प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. परिणामी, हा प्रकल्प रखडला. मात्र वर्षभरानंतर आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आठ – दहा दिवसांपूर्वीच इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – पिंपरी महापालिका शाळेतील शिक्षकांचा ताण होणार कमी; मानधनावर १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरणार

हेही वाचा – “महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव दिसतोय म्हणूनच…”; भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची टीका

जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या या वसतिगृहासाठी १९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतिगृहासाठी १८ मजली इमारत बांधण्यात येणार असून, या इमारतीत ३७५ खोल्या असतील. वसतिगृहात ५०० जणांच्या निवासाची सोय असणार आहे. या वसतिगृहात खाणावळ, बँक, व्यायामशाळा, वाहनतळ आदी सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे. सी. बी. ॲण्ड सन्स कंपनी वसतिगृहाचे बांधकाम करणार आहे. तर वास्तुशास्त्रज्ञ म्हणून मेसर्स एस. पी. शेवडे ॲण्ड असोसिएट कंपनी काम पाहत आहे. वर्षभरापासून रखडलेल्या या वसतिगृहाच्या कामाला सुरुवात झाली असून, दोन वर्षांत वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत येणाऱ्या तरुण – तरुणींच्या निवासासाठी एक चांगला आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hostel work in jijamata nagar in mumbai has finally started mumbai print news ssb