मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे. या कामादरम्यान याआधी अनेकदा दुर्घटना घडल्या असताना शनिवारी सायंकाळी मिरारोड येथील नयानगर मेट्रोच्या उन्नत मार्गातील एक हायड्राॅलिक जॅक पडला. ३० किलोचा जॅक खाली पडला, पण त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. कामात हलगर्जीपणा करणार्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यांच्या सखोल चौकशीसह त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा येत्या काही महिन्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्याच्या कामास वेग देण्यात आला आहे. या मार्गिकेचे काम सुरु असताना मिरारोड येथील नयानगर परिसरात शनिवारी सायंकाळी उंचावरुन एक लोखंडी जॅक रस्त्यावर पडला. हा जॅक ३० किलो वजनाचा होता. खाली त्यावेळी कोणीही नसल्याने कोणी जखमी झाले नाही, पण या घटनेमुळे स्थानिक, आसपासच्या नागरिकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेच्या चौकशीची मागणी अॅड. कृष्णा गुप्ता यांनी केली आहे. जबाबदारी निश्चित करून कंत्राटदार आणि अधिकारी, अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. गुप्ता यांनी एमएमआरडीएला ई मेल करून चौकशीसह गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

याविषयी एमएमआरडीएच्या अधिकार्यांकडे विचारणा केली असता शनिवारी ३० किलोचा जॅक खाली पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यु गर्डरला जोडण्यासाठी वापरण्यात येणारा जॅक कामगाराच्या हातून निसटला आणि तो खाली पडला. मात्र रस्तेरोधक लावून बंद करण्यात आलेल्या परिसरात हा जॅक पडला. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. तसेच काम करताना अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्तेरोधक लावत काही भाग बंद करण्यात येतो. हा जॅक प्रतिबंधित परिसरात पडल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. तर जॅक नागरिकांचा वावर असलेल्या ठिकाणी पडल्याचे खोडसाळपणे सांगितले जात असल्याचेही अधिकार्यांनी म्हटले. यावर गुप्ता यांनी मात्र हा जॅक रस्त्यावर पडला असून आजूबाजूला लोकांचा वावर असतो, त्यामुळे आपला हलगर्जीपणा लपवत कंत्राटदाराला वाचविण्याचा एमएमआरडीएचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

जे कुमारला १० लाखांचा दंड

मेट्रोच्या कामादरम्यान ३० किलोचा जॅक पडण्याच्या घटनेची एमएमआरडीएकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदार जे कुमारला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर उपकंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही एमएमआरडीएकडून सुरु आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे एमएमआरीडएकडून सांगण्यात आले आहे.

जे कुमार कंपनी वादात

जे कुमार कंपनीविरोधात सातत्याने कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणाचा ठपका लावत सरकारी यंत्रणांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रोच्या चाचण्या सुरु असताना मार्गिकेत पाणी शिरल्याप्रकरणी जे कुमारला दोन कोटी रुपयांचा दंड लावला होता. मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकतील पियर आणि पियर कॅप्सच्या उभारणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल आॅक्टोबर २०२४ मध्ये एमएमआरडीएने जे कुमारला ४६ लाखांचा दंड लावला होता. तर मेट्रो ९ मार्गिकेतील एका मोठा अपघाताप्रकरणी एमएमआरडीएने या कंपनीला ३०लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतरही अनेकदा एमएमआरडीएकडून कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जवळपास सहा कोटी रुपयांपर्यंतचा दंड मागील काही महिन्यात या कंपनीला ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे ही कंपनी नेहमीच वादात असते.