‘काँग्रेस सरकारच्या काळात निर्णय घेणे ही अडथळ्यांची शर्यत होती. आमची स्थिती तशी नाही. आमचे निर्णय दिल्लीत होत नाहीत, आणि गल्लीतही होत नाहीत. आमचे निर्णय मीच घेतो, कारण मी शक्तिमान मुख्यमंत्री आहे’.. अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरही टोलेबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारची संध्याकाळ रंगतदार केली. ‘लोकसत्ता’च्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिसंवादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच एकत्र येऊन ‘महाराष्ट्राच्या विकासाची नीती’ या विषयावर संवाद साधत सहमतीच्या राजकारणाचे संकेतही दिले. या समारंभात आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकसत्ताच्या ‘वर्षवेध’ या संदर्भ वार्षिकांकाचे प्रकाशनही झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यातून प्रथमच शिवसेनेला थेट इशारा दिल्याचे मानले जात आहे. शिवसेना हा भाजप सरकारचा सहकारी पक्ष असला तरी निर्णय प्रक्रियेचे सर्वाधिकार आपल्या हाती असून त्यामध्ये शिवसेनेचा अडथळा असणार नाही, असा स्पष्ट संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. काँग्रेस आघाडी सरकारात सहकारी पक्षाचे कसे अडथळे होते, हे सर्वानाच माहीत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही लगावला. सुमारे दीड तास रंगलेल्या या परिसंवादात, शेती, शिक्षण, रोजगार, उद्योग, आदी सर्वच क्षेत्रांपुढे गंभीर समस्या असल्याचे स्पष्ट झाले. भाजप सरकारने चुकीचे निर्णय घेतले तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोध करू, पण राज्यापुढील समस्या सोडविण्यासाठी सौहार्दाचे राजकारण करण्यावर काँग्रेसचा भर राहील अशी ग्वाही याच मंचावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली, तर जुन्या सरकारचे चांगले निर्णय आणि धोरणे राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. सत्तारूढ पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष यांच्यातील सहमतीच्या राजकारणाचा दिलासादायक संकेत या परिसंवादातून उपस्थितांना मिळाला.
सरकारच्या कामात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न असून कामकाजाच्या सुलभीकरणासाठी कामाचे विकेंद्रीकरण साधण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गुजरातमध्ये जाऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच, ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रमात आपण गुजरातमधील उद्योगांना महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्याचे निमंत्रण दिले, याकडेही मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष वेधले.
राज्याच्या शिरावरील कर्जाच्या मुद्दय़ावर चव्हाण व फडणवीस यांच्यात हलकीशी जुगलबंदीही झडली. आघाडी सरकारने राज्याला कर्जबाजारी केले, असा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर बोलताना, आणखी कर्ज काढण्याची महाराष्ट्राची पत आहे, याकडे लक्ष वेधत या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला. त्यावर फडणवीस यांनी सहमती दर्शविली. आमचे सरकारही गरज भासल्यास कर्ज काढेल, पण आघाडी सरकारने घेतलेल्या कर्जाचा विनियोग योग्य रीतीने झाला नाही, असा चिमटा काढून फडणवीस यांनी चव्हाणांचा युक्तिवाद परतवून लावला.

लोकप्रिय घोषणा करणे हा आमचा धर्मच आहे. आम्हाला जनतेने त्यासाठीच तर निवडून दिले आहे. जे जनतेला हवे आहे, ते आम्हाला करायचे आहे. विवेकबुद्धी जागी ठेवून घोषणा करू आणि त्या पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती उभी करू.
-देवेंद्र फडणवीस

सवंग लोकप्रियतेसाठी व मतांच्या राजकारणासाठी विरोधकांकडून घोषणा केल्या जातात. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही, हे माहीत असूनही त्या करण्यात आल्या. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी घोषणा व काम कराव
े.
– पृथ्वीराच चव्हाण

*माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येण्याचा योग ‘लोकसत्ता’ वर्धापन दिन कार्यक्रमाने अनुभवायला मिळाला. पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस नुसते एकत्रच आले नाहीत, तर दोघांनी राज्याच्या विकासाबद्दलही संवाद साधला. (छाया : प्रदीप कोचरेकर)

आज वाचक मेळावा!
ठाणे
*कुठे? द ठाणे क्लब, रहेजा कॉम्प्लेक्सलगत, तीन हात नाका, ठाणे (प.)
*कधी? सकाळी १० वाजता.
विषय : ठाणेच का?
*सहभाग : डॉ. अनिल काकोडकर, विनय सहस्त्रबुद्धे, चिन्मय मांडलेकर, मकरंद अनासपुरे
(नि:शुल्क प्रवेशिका लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, ठाणे येथे सकाळी ९ ते १० या वेळेत. दूरध्वनी- ०२२-२५३९९६०७)
डोंबिवली
*कुठे? सर्वेश सभागृह, टिळक मार्ग, डोंबिवली (पू.)
*कधी? सायंकाळी ५ वाजता
*विषय : डोंबिवली – गाव ते शहर – एक प्रवास
*सहभाग : आबासाहेब पटवारी, माधव जोशी, वसंत आजगावकर, तेजश्री प्रधान.
(नि:शुल्क प्रवेशिकांसाठी संपर्क- योगेश मोरे ९३२२९०६५०९).