मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मालाड पश्चिम येथील आक्सा समुद्रकिनाऱ्यावर विकसित करण्यात आलेला समुद्री पदपथ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. हा समुद्री पदपथ दोन महिन्यांत हटविण्याचेही आदेश हरित लवादाने सागरी मंडळाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच हा समुद्री पदपथ हटविण्यात येणार आहे.
दरम्यान, समुद्री पदपथ हटविण्याचे आदेश देतानाच हरित लवादाने समुद्र पदपथाच्या ठिकाणी धूपविरोधी उपाययोजना करण्यास परवनागी दिली आहे. त्यामुळे लवकरच धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची शक्यता आहे.
सागरी मंडळाने आक्सा समुद्री किनाऱ्यालगत सुशोभिकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध कामे करण्यात येत असून कामाला स्थगिती असल्याने प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत करण्यात आलेल्या या कामासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आक्सा समुद्र किनारी सागरी मंडळाकडून ६०० मीटर लांबीचा एक समुद्री पदपथ बांधण्यात आला आहे. या पदपथाचे काम हाती घेतल्यानंतर पर्यारवणप्रेमींनी या प्रकल्पास आक्षेप घेतला. या समुद्र किनाऱ्याच्या मधोमध हा पदपथ बांधण्याला जात असून किनारा नियमन क्षेत्राचे (सीआरझेड) उल्लंघन झाल्याचा आक्षेप घेत २०२३ मध्ये पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांच्यासह अन्य एकाने राष्ट्रीय हरीत लवादात धाव घेतली.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (एमसीझेडएम) परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे या समुद्री पदपथाच्या कामास स्थगिती दिली. मात्र स्थगिती देईपर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले होते. तर हरित लवादाकडे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सागरी मंडळाने या प्रकल्पास परवानगी मिळवली. मात्र यावरही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. प्रकल्पाचे काम योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करून तीन वेळा परवानगी नाकारल्यानंतर चौथ्या वेळी परवानगी कशी मिळाली, असा प्रश्नही याचिकार्त्यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार अखेर मंगळवारी हरित लवादाने हा समुद्री पदपथ बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
समुद्री पदपथ बेकायदेशीर असून तो दोन महिन्यांत हटविण्याचे आदेश हरित लवादाने सागरी मंडळाला दिले आहेत. मात्र त्याचवेळी या ठिकाणी धूपविरोधी उपाययोजना करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे समुद्री पदपथ हटविला जाणार असला तरी तिथे धूपविरोधी उपाययोजनांच्या अनुषंगाने इतर काही कामे केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा समुद्री पदपथ इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरला आहे. २०२४ मध्ये पदपथाचा काही भाग आणि समुद्र भिंत खचली होती. समुद्री पदपथावर मोठे भगदाड पडले होते. समुद्र किनाऱ्याच्या मधोमध हा पदपथ बांधण्यात आल्याने पदपथ, समुद्री भिंत खचत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून यावेळी करण्यात आला. कोणतेही नियोजन न करता हा समुद्री पदपथ बांधण्यात आला असून या प्रकल्पात अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे मूल्यांकन करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली होती. अखेर हरित लवादाने समुद्री पदपथ बेकायदेशीर ठरवून तो हटविण्याचे आदेश दिले आहेत.
आक्सा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या समुद्रकिनाऱ्यालगत धूप होत असल्याने, त्यामुळे समुद्र किनाऱ्याचा आकार बदलत असल्याने धूपप्रतिबंध बंधारा बांधण्याचाही निर्णय या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पातील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अपूर्ण आहेत. स्थगितीमुळे कामे बंद असल्याचे सागरी मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर हरित लवादाच्या निर्णयाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.