मुंबई : कामा रुग्णालयामधील कृत्रिम गर्भधारणा केंद्राअंतर्गत (आयव्हीएफ) सुरू झालेल्या ‘गर्भाशयात गर्भाधान’ (आययूआय) प्रक्रियेंतर्गत वर्षभरात १२ महिलांमध्ये कृत्रिम गर्भधारणा करण्यात यश आले आहे. या महिला सध्या गर्भवती असून, लवकरच त्यांचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गर्भधारणेसाठी अक्षम असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व उपचार देता यावेत, यासाठी ६ मार्च २०२४ रोजी कामा रुग्णालामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात आले. वंधत्वावर उपचार करणारे कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले. कृत्रिम गर्भधारणा केंद्राला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये सहाय्यक प्रजनन केंद्र सुरू करून त्यामध्ये ‘गर्भाशयात गर्भाधान’ (आययूआय) ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. कामा रुग्णालयात दररोज २० – ३० रुग्ण गर्भधारणेच्या समस्यांशी संबंधित उपचारासाठी येत आहेत. वर्षभरामध्ये आययूआयअंतर्गत उपचारासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी पालघर व रायगडसह राज्यातील विविध भागातून जवळपास ४२२ महिलांनी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी केली. कृत्रिम गर्भधारणा उपचार महागडे असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे कामा रुग्णालयातील केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील सहाय्यक प्रजनन केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये नोंदणी केलेल्या ४२२ रुग्णांपैकी १०० महिलांची निवड ‘गर्भाशयात गर्भाधान’ या पक्रियेसाठी करण्यात आली. त्यांच्यावर प्रक्रिया सुरू केल्यानंतर १२ महिलांमध्ये यशस्वी गर्भधारणा राहण्यास मदत झाली असून, उर्वरित महिलांवर उपचार सुरू आहेत. गर्भधारणा झालेल्या १२ महिलांचे लवकरच आई होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च

खाजगी रुग्णालयांमध्ये कृत्रिम गर्भधारणेसाठी आकारला जाणारा खर्च लाखो रुपयांच्या घरात असल्याने सर्वसामान्यांना तो परवडणारा नसतो. त्यामुळे कामा रुग्णालयात कृत्रिम गर्भधारणा केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुरू केलेले ‘गर्भाशयात गर्भाधान’ आशेचा किरण ठरले आहे. या केंद्रामध्ये रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार केले जात आहेत. वंध्यत्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे केंद्र अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून देण्यात यशस्वी ठरेल, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

आययूआय म्हणजे काय ?

आययूआय म्हणजे सहाय्यक प्रजनन क्रिया असते. ही प्रक्रिया गर्भधारणेसाठी मदत करते. यामध्ये तयार केलेली शुक्राणू गर्भाशयामध्ये थेट ठेवले जातात. त्यामुळे गर्भधारणा होण्याच्या शक्यतेत वाढ होते. हे बहुतेकदा वंध्यत्व किंवा सौम्य प्रजनन समस्या असणाऱ्या जोडप्यांसाठी वापरले जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 12 couples will have children due to iui at cama hospital mumbai print news css