मुंबई : वैयक्तिक वादातून झालेल्या भांडणानंतर मंगळवारी दुपारी एका २२ वर्षीय तृतीयपंथीयाने माहीमच्या खाडीत उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी २० वर्षीय तरुणानेही खाडीत उडी मारली. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशीरापर्यंत या दोघांचा शोध घेतल होते.

तृतीयपंथी इर्शाद आसिफ शेख (२२) आणि कलंदर अल्ताफ खान (२०) हे दोघे वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगरमधील लालमट्टी परिसरातील रहिवासी आहेत. दोघे मंगळवारी सकाळी माहीम खाडीजवळ बोलत उभे होते. त्यांच्यात मोबाइलवरील छायाचित्रे आणि काही संदेशावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. इर्शादने अचानक दुपारी १२.३० च्या सुमारास माहीमच्या खाडीत उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी कलंदर खाननेही खाडीत उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशीरापर्यंत या दोघांचा शोध घेत होते.