मुंबई : कर्ज वितरणातील अनियमितता आणि लाचखोरीच्या प्रकरणी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडचे (बीईसीआयएल) तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज कुरुविला, तत्कालीन महाव्यवस्थापक डब्ल्यू. बी. प्रसाद, कायदेशीर सल्लागार आशिष प्रताप सिंह, तसेच मुंबईतील खासगी कंपनी ‘द ग्रीन बिलियन्स लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रतीक कनकिया यांच्यासह एकूण पाच आरोपींविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबाआय) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबतची माहिती सीबीआयकडून शुक्रवारी देण्यात आली.
बीईसीआयएल तक्रारीवरून २०२४ मध्ये सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीईसीआयएलचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापक यांनी नियमानुसार ठरवलेल्या कार्यपद्धतीचे उल्लंघन करून ‘द ग्रीन बिलियन्स लिमिटेड’ (टीजीबीएल), मुंबई या कंपनीला ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. ही कंपनी प्रतीक कणकिया यांच्या नियंत्रणाखाली असून, कर्जाचा उद्देश पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी होता. मात्र, बीईसीआयएलने मंजूर केलेले हे कर्ज प्रकल्पासाठी न वापरता इतर अनेक संस्थांना व व्यक्तींना वळवण्यात आले. प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला नाही, असा आरोप आहे. यामुळे प्रतीक कणकिया आणि त्यांच्या कंपनीने एकूण ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरवापर केल्याचे आरोप आहे. याप्रकरणी ३ सप्टेंबर, २०२४ रोजी सीबीआयने तपासाला सुरूवात केली होती.
तपासात व्यवहारांची माहिती
कर्जाची रक्कम १२ कोटी ५० लाख रुपये (८ एप्रिल २०२२), १७ कोटी ५० लाख रुपये (२० जून २०२२) आणि २० कोटी (२९-३० डिसेंबर २०२२) या तीन टप्प्यांमध्ये देण्यात आली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपनीच्या सीईओने हा निधी प्रकल्पासाठी वापरला नाही. याऐवजी, त्यांनी स्वतःसाठी पैसे वापरले आणि एप्रिल २०२२ मध्ये २ कोटी आणि एप्रिल २०२३ मध्ये १ कोटी रुपयांची लाच बीईसीआयएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज कुरुविला यांना दिली.
अतिरिक्त निधी व बनावट हमीपत्र
पुढील टप्प्यात, आरोपी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ५ सप्टेंबर २०२२ रोजी २५ कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मंजूर केले. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या घाटकोपर शाखेची बनावट परफॉर्मन्स बँक गॅरंटी (पीबीजी) तयार करण्यात आली. कर्ज मंजूर करताना कोणतीही हमी घेण्यात आली नाही, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली. या संपूर्ण गैरप्रकारामुळे बीईसीआयएलला एकूण ५८ कोटी ६० लाख रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचलाक, महाव्यवस्थापक व खासगी कंपनीचा सीईओ यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआय या संपूर्ण प्रकरणात तपास करीत असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हेगारी कट रचणे, विश्वासघात, फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.