मुंबई : घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी उपनगरीय लोकल अवलंबून आहेत. लाखो प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका सोसावा लागत आहे. गेल्या सहा दिवसांत विविध कारणांमुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल ४०० लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. तसेच ६५० लोकल विलंबाने धावल्यामुळे मुंबईकरांचे अक्षरश: मेगाहाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर १,८१० लोकल फेऱ्या चालविण्याचा दावा केला जातो. वास्तवात या मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात येतात. तसेच प्रवाशांना इच्छित लोकल दररोज १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याची उद््घोषणा वारंवार ऐकावी लागते. २५ ते ३० जानेवारी या कालावधीत मध्य रेल्वेवरील ४०० हून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत. याच कालावधीत ६५० लोकल विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्वाधित लोकल रद्द कराव्या लागल्या, तर अनेक लोकल विलंबाने धावत होत्या. त्याचबरोबर मुख्य मार्गापाठोपाठ हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलही रद्द कराव्या लागल्या, तर काही लोकल विलंबाने धावत होत्या, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरील लोकल प्रचंड विलंबाने धावत आहेत. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास उशीर होत आहे. लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेकांना फटका बसत आहे. त्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात येते. रुग्णांना रुग्णालयात, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहचण्यास उशीर होतो. तसेच लोकल रद्द केल्याने प्रवाशांना गर्दीतून लोकलमधून प्रवास करावा लागतो. लोकल दररोज उशिराने धावल्याने, अनेक प्रवाशांची महत्त्वाची कामे रखडतात.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाचे काम सुरू होते. त्यामुळे प्रवाशांचा रोजचा प्रवास २० ते ३० मिनिटांनी वाढत आहे. तसेच सीएसएमटी ते भायखळ्यादरम्यानचे सुमारे ४.२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी नियोजित वेळेनुसार ८ ते १० मिनिटांत प्रवास होणे अपेक्षित आहे. मात्र या प्रवासासाठी सुमारे १५ ते २० मिनिटे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. तसेच अनेक मार्गावर घातलेली वेगमर्यादा, घेण्यात येणारे आत्पकालीन ब्लाॅक यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडत आहे. परिणामी, प्रवाशांना नियोजित वेळापत्रकानुसार प्रवास करणे अवघड होऊ लागले आहे.

जानेवारी २०२४ च्या तुलनेत जानेवारी २०२५ मध्ये विलंबाने धावणाऱ्या लोकलच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,७५० हून अधिक लोकल विलंबाने धावल्या होत्या. तर, जानेवारी २०२५ मध्ये ३ हजारांहून अधिक लोकल उशिराने धावल्या.

प्रजासत्ताक दिनी प्रवाशांचा खोळंबा

प्रजासत्ताक दिनी रविवारी प्रवाशांना लोकल खोळंब्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. रविवारी १,४६८ लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजित होते. मात्र, यापैकी २४० हून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. तर, २५० हून अधिक लोकल विलंबाने धावल्या. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनासाठी जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस व इतर नोकरदारांना इच्छितस्थळी वेळेवर पोहोचता आले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai central railway cancelled 400 local trains in six days mumbai print news css