मुंबई : कोकण रेल्वेवरील ११०९९/ १११०० एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस सातत्याने विलंबाने धावत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री १२.४५ वाजता एलटीटीवरून सुटणारी रेल्वेगाडी बरेच तास उशिराने सुटते. त्यामुळे ही रेल्वेगाडी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. त्यामुळे प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत.

गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटण्याऐवजी रात्री २.४५ वाजता सुटली. त्यामुळे ही रेल्वेगाडी मडगावला शुक्रवारी सकाळी ११.५५ ऐवजी दुपारी ३.५६ वाजता पोहचली. तसेच गाडी क्रमांक १११०० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस मडगाववरून दुपारी १२.३० वाजता सुटणार होती. परंतु, या नियोजित वेळेत सुधारणा करून, ही रेल्वेगाडी दुपारी २.३० वाजता सुटण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, तरीही मडगाववरून ही रेल्वेगाडी दुपारी ४.३४ वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास अत्यंत धीम्यागतीने सुरू होता. परिणामी, प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी दररोज चार ते पाच तास विलंब होत आहे. रेल्वेच्या अनियोजित वेळापत्रकामुळे मुंबईतून गावी जाणाऱ्या आणि गावातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.

गेल्या सलग दोन आठवड्यापासून एलटीटी – मडगाव आणि मडगाव – एलटीटी एक्स्प्रेस विलंबाने धावत आहे. प्रवाशांचा प्रवास वेळेत आणि वेगात होणे अपेक्षित होत असताना, प्रवाशांना चार ते पाच तासांचा विलंब सहन करावा लागतो. रेल्वेगाडीच्या सुधारित वेळापत्रकामुळे पुढील दोन दिवस गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १११०० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.

मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १८ मे २०२५ रोजी मडगावहून नियोजित वेळापत्रकानुसार, तब्बल ९ तास ५६ मिनिटे विलंबाने सुटली. तसेच इतर दिवशी ही रेल्वेगाडी उशिराने धावते. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास रखडत होत आहे.