मुंबई : विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पिता आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई, मुलगा आणि शेजारी राहणारे अन्य दोघेजण जखमी झाले असून सर्व जखमींवर घाटकोपराच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पार्कसाईट येथील वर्षा नगर विभागातील जनकल्याण सोसायटीमधील मिश्रा कुटुंबाच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक डोंगराचाच्या मोठा भाग कोसळला. मिश्रा कुटुंबीय गाढ झोपेत असताना ही घटना घडली. शेजाऱ्यांनी तत्काळ दुर्घटनेची माहिती महापालिका आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेली आणि बचावकार्य सुरू केले.
डोंगरावरून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा घरावर कोसळला असून सध्या हा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरेशचंद्र मिश्रा, आरती मिश्रा, ऋतुराज मिश्रा आणि शालू मिश्रा या चौघांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सुरेशचंद्र मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप – लेकीचा मृत्यू झाला. तर आरती आणि ऋतुराज हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्कसाइट भागातील डोंगरावर वर्षा नगर वस्ती असून या ठिकाणी वारंवार आशा घटना घडत असल्याने नगरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या घटनास्थळी राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत.