मुंबई : वांद्रे वरळी सागरी सेतूवर (सी लिंक) गाडी थांबवून धोकादायक ‘स्टंटबाजी’ करणारा प्रसिद्ध गायक-गीतकार यासेर देसाईसह तिघांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागरी सेतूवर स्टंटबाजी करतानाची एक चित्रफित मंगळवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वाहन सागरी सेतूवर थांबवण्यात आले होते. त्या वाहनातून तिघे खाली उतरले. त्यातील एक जण पुलाच्या कठड्यावर चढून स्टंट करीत होता. त्याच्यासोबत असलेले दोघे या स्टंटबाजीचे चित्रिकरण करीत होेते. या स्टंटबाजीची चित्रफित मंगळवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या या चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. सागरी सेतूवरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता घडल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आढळून आले. स्टंटबाजी करणारा प्रसिद्ध गायक-गीतकार यासेर देसाई असल्याचे नंतर स्पष्ट झाले. वांद्रे पोलिसांनी यासर देसाईसह इतर दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घालणारी कृती (स्टंट) केल्याप्रकरणी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रे वरळी सागरी सेतूवर वाहने थांबविण्यास मनाई आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारची कृती करणे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून याप्रकरणी संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.