Mumbai Rain Update: मागील दोन दिवसांपासून रिपरिपणाऱ्या पावसाने बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांत दाणादाण उडविली आहे. ढगांचा गडगडाट, वीजांसह शहर आणि उपनगरांत दिवसभर पाऊस कोसळत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रीच्या खरेदीसाठी फुलून गेलेल्या बाजारपेठा सकाळपासून दाटून आलेले आभाळ, पाऊस यांमुळे ओस पडल्या आहेत. ठिकठिकाणी साचलेले पाणी, कमी झालेली दृश्यमानता यांमुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला येथे पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण हंगाम हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजांना तुरी देणाऱ्या पावसाने यावेळी विभागाचा अंदाज बुधवारी खरा ठरवला आहे. हा आठवडा पावसाचा असल्याचा अंदाज विभागाने जाहीर केला होता. शहर आणि उपनगरांत गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. बुधवारी मात्र शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह पूर्व उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे काही भागात पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कर्मचारी वर्गाला कार्यालय गाठण्यासाठी कसरत करावी लागली. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरेल अशी आशा असतानाच पावसाचा जोर आणखी वाढला. सायंकाळी शहर भागातही पावसाचा जोर वाढला. सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळी मिट्ट काळोख झाला होता.

हेही वाचा : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ७५ हजार जागा वाढणार, येत्या पाच वर्षांत जागा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बुधवारी सकाळपासूनच धीम्या गतीने सुरू आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उपनगरातील वाहतूकीवर अधिक परिणाम झाला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, सायन, माटुंगा, परळ या ठिकाणी वाहतुक खोळंबली आहे. हाजी अली, सेना भवन, वांद्रे, कुर्ला या भागात सायंकाळी वाहतुकीची गती मंदावली होती. तसेच रेल्वे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. परिणामी मुंबईकरांना घरी परततानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai traffic jam on most of the roads due to heavy rainfall mumbai print news css