मुंबई– पहाटे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या २९ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या महिलेने आपल्याकडील दागिने देऊन कशीबशी आपली सुटका केली. बोरीवलीच्या सुधीर फडके पुलाखाली सोमवारी पहाटे ही घटना घडली. मालाड पोलिसांनी याप्रकरणी तपास करून आरोपी संजय राजपूत (३५) याला अटक केली आहे.
तक्रारदार महिला ही गृहिणी असून ती दहिसर (पूर्व) येथे राहते. सोमवार १० नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे पाऊणे पाचच्या सुमारास ती जैन मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. बोरिवली पश्चिमेतील एका जैन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ती दहिसर पश्चिमेकडील शांतिलाल जैन मंदिरात गेली. तेथे तिला काही परिचित भेटले. त्यानंतर तिने मंडपेश्वर रोडवरील आणखी एका मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी सुमारे ५.३० वाजता ती बोरिवलीच्या सुधीर फडके पुलाखालून एकटी चालत होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिच्या मागून येत तिला पकडले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या अंधाऱ्या भागात ओढून नेले. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
दागिने देऊन जीव वाचवला..
घाबरलेल्या महिलेने त्याच्याकडे सोडून देण्याची विनंती केली. मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यावेळी महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि कानातले असे दागिने काढून दिले. आरोपीने तिला सोडले. मात्र जाताना तिचा मोबाईल फोन आणि इअरफोन हिसकावून घेतले. थोड्याच वेळात त्या महिलेला पुलाजवळ उभी असलेली पोलीसांची गाडी दिसली. तिने पोलिसांना ताबडतोब संपूर्ण घटनेची माहिती देऊन आरोपीचे वर्णन सांगितले. बोरिवली पोलिसांनी तक्रार नोंदवून शोधमोहीम सुरू केली.
आरोपी गजाआड
महिलेच्या तक्रारीनंतर बोरिवली, मालाड आणि कांदिवली पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. मालाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्रभर शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्हीच्या आणि तांत्रिक तपास करून मंगळवारी आरोपीला अटक केली. संजय राजपूत (३५) असे या आरोपीचे नाव आहे. राजपूत हा दहिसरमधील प्रेमनगर येथे राहतो. तो एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे तसेच रस्ते साफ करण्याचे काम करतो.
