मुंबई: टेलिग्रामवर शोध घेऊन समलिंगी संबंध ठेवणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले. त्याच्याशी समलिंगी संबंध ठेवून त्याची चित्रफित तयार करण्यात आली आणि त्याच्याकडून ४१ हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकऱणी मेघवाडी पोलिसांनी ४ जणांना अटक केली.
फिर्यादी तरूण २६ वर्षांचा असून खासगी कंपनीत काम करतो. तो टेलिग्राम या ॲपवर समलैंगिक संबंधासाठी जोडीदार शोधत होता. त्यात तो एका समूहाच्या संपर्कात आला. समोरील तरुणाने आपले छायातित्र पाठवले आणि कुठेही येण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार जोेगेश्वरी येथील घरी सोमवारी भेटण्याचे ठरले. ठरल्यानुसार आरोपी तरुण आला. त्यावेळी त्याचे अन्य ३ साथीदार तेथे होते. आरोपी तरुणाने त्याच्याशी समलिंगी संबंध बनवले. यावेळी अन्य आरोपींनी त्याची चित्रफित तयार केली आणि ती वायरल करण्याची धमकी दिली.
तरुणाने याला नकार दिल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे एटीएम कार्ड आणि ओटीपी घेण्यात आला. त्यानंतर बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊन त्यांनी ४१ हजार रुपये काढले. त्यादरम्यान, तक्रारदार तरुणाला घरात कोंडून ठेवण्यात आले होते. सुटका करवून घेतल्यानंतर तरुणाने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी ४ अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), १२७ (२), ११५, ३५१ (३), ३५, ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी या ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपी याच परिसरात राहणारे आहेत. डेटिंग ॲपवरून त्यांनी तक्रारदार तरुणाशी ओळख करून घेतली होती, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली. आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी अशाप्रकारे गुन्हे केले आहेत का त्याचा तपास करण्यात येत आहे, असे जाधव यांनी सांगितले.
अनोळखी ॲपपासून सावध रहा
समलिंगी संबंधासाठी विविध ॲप्स आहेत. त्यापैकी अनेक ॲप्स बोगस असून त्याद्वारे फसवणूक करण्यात येते. विविध ॲप्सचा टेलिग्रामसारख्या माध्यमांवर शोध घेताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
