मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लोकप्रिय व्याघ्र सफारी आता अधिक आकर्षक ठरणार आहे. उद्यानातील वाघीण श्रीवल्लीने (टी २४ – सी २) एक वर्षापूर्वी जन्म दिलेल्या तीन बछड्यांना मंगळवारी सफारीत दाखल करण्यात आले. त्यामुळे यापुढे पर्यटकांना या बछड्यांचेही दर्शन घडणार आहे.

राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र आणि सिंह सफारी आकर्षण बनली आहे. पर्यटकांना सुरक्षित मिनी बसमधून जंगलात वाघांचे, तसेच सिंहाचे दर्शन घेता येते. आता या व्याघ्र सफारीमध्ये नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणारे श्रीवल्लीचे तीन बछडेही सहभागी झाल्यामुळे सफारीचा अनुभव अधिक थरारक होणार आहे. दरम्यान, श्रीवल्लीने १७ मे २०२४ रोजी या बछड्यांना जन्म दिला होता. आता त्यांना मुख्य सफारीमध्ये सोडण्यात आले आहे. हे तिन्ही बछडे एक वर्षांचे आहेत. राष्ट्रीय उद्यानातील वाघांची संख्या आता आठ झाली असून त्यात या तीन बछड्यांचाही समावेश आहे.

या तिन्ही बछड्यांची तब्येत चांगली असून, ते सफारी परिसराशी चांगले जुळवून घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव जपणूक व संवर्धनाच्या दृष्टीनेही एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे, असे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. निसर्गप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार आणि नियमित पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

श्रीवल्लीचा प्रवास…

श्रीवल्लीने २०२२ मध्ये एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर तिला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून चंद्रपूर संक्रमण शिबिरात नेण्यात आले आणि त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. श्रीवल्लीने २५ मार्च २०२३ रोजी चार बछडय़ांना जन्म दिला. त्यापैकी एकाचा त्याच दिवशी मृत्यू झाला. कालांतराने दोन बछडय़ांचाही मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या बछड्य़ाला फुप्फुसांशी संबंधित समस्या होती. तर त्यानंतर मृत्यू झालेल्या बछड्य़ांना आरोग्याशी संबंधित समस्या होत्या. या चार बछड्यांमधील केवळ एक नर बछडा जगला होता. श्रीवल्लीला बंदिस्त वातावरणात राहण्याची सवय नसल्याने आणि अचानक उद्यानात पिंजऱ्यात ठेवल्यामुळे ती तणावाखाली आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर श्रीवल्लीने २०२४ मध्ये पुन्हा एकदा बछड्यांना जन्म दिला होता.