मुंबई : अंधेरी आरटीओमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने केलेल्या १०० हून अधिक वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने नाशिकचे आरटीओ अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन कली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील भंगार झालेल्या, आयुर्मान संपत आलेल्या, बॅंकांनी लिलावात काढलेली वाहनांची खरेदी करून त्यांची बनावट कागदपत्र्यांच्या आधारे परराज्यात नोंदणी करण्यात येत होती. त्यानंतर पुन्हा ही वाहने राज्यात आणून त्यांची पुनर्नोंदणी केली जात होती. अशा १०० हून अधिक वाहनांची पुनर्नोंदणी अंधेरी आरटीओमध्ये करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. परिवहन विभागातील मोठा घोटाळा मानला जात आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने नाशिकचे आरटीओ अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा >>> शाळांच्या वेळांमधील बदलः बसचालक आक्रमक, पालकांनाही आर्थिक भुर्दंड

अंधेरी आरटीओमध्ये परराज्यातून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन १२५ वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले. तसेच यापैकी बहुतांश वाहनांची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असून वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘वाहन’ या संगणकीय यंत्रणेवर सुध्दा ती उपलब्ध नसल्याचे समोर आले. असाच प्रकार याआधी वाशी, वसई आरटीओत घडला होता. तर, हा गैरप्रकार संपूर्ण महाराष्ट्रभर होत असल्याची माहिती आरटीओमधील सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करून चौकशी केली जाणार आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील चौकशी सुरू आहे. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच या प्रकरणातील चार कारकुनांची परिवहन मुख्यालय आणि इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. – जे. बी. पाटील, अपर परिवहन आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry committee set up to investigate scam in rto department mumbai print news zws