मुंबई : पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याच्या शासन निर्णयाला शालेय बसगाडी चालकांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील सकाळी ८ ते ९ दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचवायचे कसे, असा प्रश्न बसगाडी चालकांनी उपस्थित केला आहे. तसेच सकाळी पूर्व प्राथमिक ते चौथी आणि पाचवी ते दहावी, अशा दोन सत्रांसाठी बसगाड्यांच्या संख्येसह मनुष्यबळातही वाढ करावी लागेल. परिणामी बसगाडी चालकांसह पालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे मत बसगाडी चालकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
मुंबईतील सकाळच्या सत्रातील बहुसंख्य शाळा सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान भरतात. त्यानुसार सर्व बसगाड्यांची आणि बसगाड्यांमधील महिला सहाय्यक व इतर मदतनीसांचीही व्यवस्था केली असते. परंतु आता पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मुंबईतील नागरिक कामाला जात असतात. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. यातच पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसगाड्या सकाळी ९ च्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत शाळेपर्यंत कशा आणायच्या, असा प्रश्न बसगाडी चालकांना पडला आहे. या निर्णयात सकारात्मक बदल करावा, अशी मागणी शालेय बसगाडी चालकांकडून करण्यात येत आहे. ‘पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग व संबंधित मंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे. या निर्णयामुळे वेळेचे नियोजन कसे करणार, याची विचारणा केली. तसेच मुख्यध्यापकांशीही संवाद साधला आहे. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आता शाळांना सुट्टी आहे, परंतु जूनपासून शाळा सुरू झाल्यावर वेळेचे नियोजन व बसगाड्यांची व्यवस्था कशी करणार, असा प्रश्न आहे. दोन सत्रात बसगाड्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याचा विचार होणे गरजेचे आहे. परिणामी बसगाड्यांची जास्त आवश्यकता भासेल. यावर तोडगा निघाला नाही, तर बसगाड्यांच्या शुल्कामध्ये ३० टक्के वाढ करावी लागेल. ही दरवाढ झाल्यानंतर पालकांवरही आर्थिक ताण वाढेल. यामुळे बसगाडी चालक, पालक व शिक्षकांनाही नियोजनात बदल करावा लागणार आहे’, असे स्कूल ॲण्ड कंपनी बस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.