पंतप्रधानांकरवी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याचे आवाहन
प्रसाद रावकर, मुंबई</strong>
‘मेट्रो -३’ प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करून उभारण्यात येणारी कारशेड अन्यत्र हलवून आरे वसाहतीमधील वृक्ष आणि वन्य संपदा वाचविण्यासाठी ‘काश फाऊंडेशन’ आणि विद्यार्थ्यांनी ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर जंगल सफरीचे दर्शन घडविणाऱ्या बेअर ग्रिल्सला थेट साद घातली आहे.
‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरील ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जंगल सफरीचे दर्शन घडविणाऱ्या बेअर ग्रिल्ससोबत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची सफर केली होती. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील ढिकाला भागात मोदी आणि ग्रिल्स यांनी जंगल सफरीचा आनंद घेतला होता. त्यात मोदी यांनी व्यक्त केलेल्या पर्यावरण प्रेमाची मोठी चर्चाही झाली होती. त्यामुळेच आरे वसाहतीमधील वृक्ष-नव्य संपदेचे संरक्षण करण्याची विनंती तुम्ही आमच्या पंतप्रधानांना करावी, असे आवाहन या विद्यार्थ्यांनी बेअर ग्रिल्सला पत्र पाठवून केली आहे. बेअर ग्रिल्सकडून येणाऱ्या प्रतिसादाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे वसाहतीमध्ये कारशेड उभारण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तब्बल २,७०३ वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे.
वृक्ष हटविण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने मतदानाअंती मंजुरी दिली असून मतदानाच्या वेळी झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे सनदशीर मार्गाने ही लढाई लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्याचबरोबर काही सामाजिक संस्था, संघटना आणि समाजसेवक आरे वसाहत वाचविण्यासाठी पुढे आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘काश फाऊंडेशन’नेही आरे वसाहत वाचविण्यासाठी हे पाऊल टाकले आहे.
आरे वसाहतीमध्ये १३ जातीचे उभयचर, ९० जातीच्या कोळ्यांच्या प्रजाती, ४६ जातीचे सरपटणारे प्राणी, ३४ प्रकारची जंगली फुले, ७७ जातीचे पक्षी, नऊ बिबटे आणि २८ आदिवासी पाडे आहेत. त्याशिवाय विविध जातीची तब्बल चार लाख ८० हजार वृक्ष संपदाही आहे. आरे वसाहतीमधील २,७०३ झाडांची कत्तल करून तेथे ‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात आरे वसाहतीमधील वृक्ष-वन्य संपदा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या नरेंद्र मोदी यांना आरे वसाहत वाचविण्यासाठी विनंती करा, असे आवाहन ‘काश फाऊंडेशन’ने ग्रिल्स यांना केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरे वसाहतीऐवजी कांजूरमार्ग अथवा वांद्रे-कुर्ला वसाहतीमध्ये कारशेड उभारण्याची सूचना करण्यास मोदी यांना विनंतीपूर्वक सांगावे, असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे.
कांजूरमार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलात मुबलक जागा उपलब्ध आहे. ‘मेट्रो-३’ची कारशेड आरे वसाहतीऐवजी कांजूरमार्ग अथवा वांद्रे-कुर्ला संकुलात उभारावी. त्यामुळे आरे वसाहतीमधील वृक्ष-वन्य संपदेचे संवर्धन होईल आणि मुंबईकरांसाठी फुप्फुस ठरलेल्या आरे वसाहतीचे संरक्षण होईल.
अवकाश जाधव, विश्वस्त, ‘काश फाऊंडेशन’